News

भाजपमध्ये पुन्हा गटबाजी.

8Views

 जळगाव :-

लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून प्रचारासह राजकीय घडामोडींना गती आली असताना जळगाव महापालिकेच्या भाजपमधील गटबाजी थांबायचे नाव घेत नसल्याने पक्षाची डोकेदुखी वाढली आहे. पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मदत करण्यासाठी नगरसेवकांकडून एक महिन्याच्या मानधनाचे धनादेश जमा करण्यात येत आहे. हे धनादेश कुणाच्या माध्यमातून द्यावे यावरून भाजपमधील गटबाजी शनिवारी पुन्हा उफाळून आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. आमदार सुरेश भोळे व नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात फोनवरून जोरदार खडाजंगी झाल्याने नगरसेवकांमध्ये खळबळ उडाली.

जळगाव महापालिकेत गेल्या निवडणुकीत सत्तांतर होऊन माजी मंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पराभव करीत भाजपचे ७५ पैकी तब्बल ५७ नगरसेवक निवडून आले. भाजपने महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी, खान्देश विकास आघाडी व शिवसेनेचे नगरसेवक फोडून त्यांचा भाजपात प्रवेश करून घेतला होता. त्यामुळे भाजपचे ५७ नगरेसवकांच्या माध्यमातून महापालिकेत बहुमत असले तरी भाजपात मात्र या ५७ नगरसेवकांचे एकमत नसल्याचे चित्र अनेकवेळा समोर आले आहे. भाजपच्या महापालिका गटात गेल्या सात महिन्यांत बहुतांशवेळा गटबाजीचा अनुभव आला आहे.
महापौर, उमहापौर व स्थायी सभापती पदासाठीदेखील गटबाजीतूनच जोरदार रस्सीखेच झाली होती. यापूर्वीदेखील शेवभाजी पार्टीच्या निमित्ताने एकत्र येऊन भाजपातील एका गटाने दुसऱ्या गटाविरुद्ध नाराजी दर्शविली होती. त्यानंतर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सर्व नगरसेकवकांना वाद मिटवून एकत्र राहण्याबाबत कानपिचक्या दिल्या होत्या. तरीही भाजपमधील ही अंतर्गत गटबाजी शमलेली दिसत नाही.

धनादेशाचे श्रेय कोणाचे?
पुलवामा येथील हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी नगरसेवक कैलास सोनवणे यांच्या स्वामी विवेकानंद मंडळाकडून मदत गोळा करण्यात येत आहे. त्या अंतर्गत महापालिकेतील सर्व नगरसेवकांचे एका महिन्याचे मानधनदेखील या मदतनिधीत देण्याचा निर्णय झाला होता. यासाठी नगरसेवकांचे मानधन काढून मदतनिधीसाठी धनादेश घेण्यात येत आहेत. हे धनादेश कुणाच्या माध्यमातून द्यावे या श्रेयावरूनच आमदार सुरेश भोळे व नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यात वाद झाला.

फोनवरूनच खडाजंगी
नगरसेवक कैलस सोनवणे हे दुपारी १२ वाजता महापालिकेत आले होते. या वेळी धनादेश जमा कुठे जमा करावे या विषयाची माहिती सोनवणे यांना मिळाली. त्यानंतर संतप्त झाले. त्यांनी तेथूनच आमदार सुरेश भोळे यांना फोन केला, फोनवरच दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. विशेष म्हणजे सोनवणे यांनी फोन केला. त्यावेळी त्यांच्याजवळ भाजपचे नगरसेवक सुनील खडके, चेतन सनकत, भरत सपकाळे यांच्यासह अन्य नगरसेवकदेखील उपस्थित होते. त्यानंतर महापौरांच्या दालनात गटनेते भगत बालाणी आले होते. त्यांच्यासमोर कैलास सोनवणे यांनी संताप व्यक्त केला.

वाद नसल्याचा आमदारांचा दावा
सध्या आम्ही सर्वांशी जूळवून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यामुळे आमच्या पक्षात वाद होण्याचा प्रश्नच येत नाही. सोनवणेंशी कुठल्याही प्रकारचा वाद झाला नसल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली. नगरसेवक सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता. तर भाजपचे गटनेते भगत बालाणी यांना याबाबत विचारणा केली अद्याप माहिती नसून, ती घेऊन सांगतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply