News

भाजप नव्या मुख्यमंत्र्यांच्या शोधात.

4Views

पणजी :-

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरयांची प्रकृती ढासळली असल्याने राज्यात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारसमोर संकट उभे राहिले आहे. ही परिस्थिती लक्षात घेत काँग्रेसनेही राज्यपालांना पत्र लिहून सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. काँग्रेसच्या या पवित्र्यानंतर भाजप सावध झाला असून कोणत्याही परिस्थितीत पक्षाने आपले सरकार वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पक्षाने वेळ न दवडता काल पासूनच (शनिवार) नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध सुरू केला आहे.

नवा मुख्यमंत्री विद्यमान आमदारांमधूनच निवडला जाईल असे भाजपने आमदारांच्या बैठकीत स्पष्ट केले आहे. राज्यातील आमदारांशी चर्चा करून केंद्रीय नेतृत्व नव्या मुख्यमंत्र्यांबाबत निर्णय घेईल. यासाठी केंद्रातील प्रतिनिधी लवकरच गोव्यात पोहोचत आहेत. भाजप आघाडीतील सहकारी पक्ष असलेले गोमंतक पक्ष, गोवा फॉरवर्ड पक्ष आणि तीन अपक्ष आमदारांशीही चर्चा करण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे.

सहकारी पक्षांचा पाठिंबा

गोवा फॉरवर्ड पक्षाचे तीन आमदार आणि तिन्ही अपक्ष आमदारांनी शनिवारी पर्रीकर यांच्या निवासस्थानी भेट देत आपले समर्थन जाहीर केले. मुख्यमंत्री पर्रीकर यांची प्रकृती ढासळली असली तरी देखील जो पर्यंत पर्रीकर पदावर आहेत, तो पर्यंत आमचा त्यांना पाठिंबा असेल असा विश्वास मंत्री विजय सरदेसाई यांच्या नेतृत्त्वात पर्रीकरांची भेट घेणाऱ्या या आमदारांनी पर्रीकर यांना दिला आहे. मुख्यमंत्री पर्रीकर काम करत असल्याने सध्या दुसऱ्या मुख्यमंत्र्यांची काहीएक गरज नाही, असे सरदेसाई यांनीही म्हटले आहे. मात्र, भाजपच्या वेगळा पवित्रा असेल तरी देखील आपण भाजपला पाठिंबाच देऊ, असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा

विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत उर्फ कवळेकर यांनी शनिवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन राज्यात सरकारस्थापनेचा दावा केला. मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीमुळे राज्यात सध्या निर्नायकी अवस्था असल्यामुळे राज्यातील भाजप सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणीही कवळेकर यांनी केली. गोवा विधानसभेत एकूण ४० जागा आहेत. त्यापैकी म्हापशाचे भाजपचे आमदार फ्रान्सिस डिसोझा यांचे नुकतेच निधन झाले. मांद्रे येथील काँग्रेसचे आमदार दयानंद सोपटे आणि शिरोड्याचे सुभाष शिरोडकर यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. या तिन्ही मतदारसंघांत लोकसभा निवडणुकीबरोबरच २३ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. सध्या भाजपचे १३ आमदार असून, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रत्येकी तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एक आमदार भाजपसोबत आहेत. काँग्रेसकडे १४ आमदार आहेत. कवळेकर यांनी राज्यपालांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की डिसोझा यांचे निधन आणि मुख्यमंत्री पर्रीकर यांचे प्रकृतीअस्वास्थ्य यामुळे सरकारने सभागृहातील बहुमत गमावले आहे. त्यामुळे आपण राज्यातील भाजपचे सरकार बरखास्त करावे आणि बहुमत असलेल्या काँग्रेसला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे.’

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply