News

भाजप-शिवसेना युतीत काटोलची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे.

12Views

नागपूर:-

भाजप-शिवसेना युतीत काटोलची जागा शिवसेनेच्या वाट्याला आहे. मागील निवडणुकीत युती तुटल्यानंतर भाजपने ही जागा जिंकली. याच भरवशावर भाजप कार्यकर्ते पोटनिवडणुकीत या जागेवर दावा करीत आहेत. युती धर्मात शिवसेनेची ही जागा असतानाही अकारण वाद निर्माण केला जात असल्याचे सांगत कार्यकर्त्यांनी मंगळवारी ‘मातोश्री’ गाठली. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच युतीत ताण निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

डॉ. आशीष देशमुख यांनी राजीनामा दिल्यानंतर काटोल येथील विधानसभेची जागा रिक्त झाली होती. त्या जागेवर केवळ तीन महिन्यांसाठी लोकसभेसोबत पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युती झाली असली तरी काटोलमध्ये दोन्ही पक्ष दावेदारी करीत आहेत. मुळात युतीच्या काळात काटोल हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. २०१४च्या निवडणुकीत युती तुटली आणि दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले. भाजपच्या तिकीटावर डॉ. आशीष देशमुख विजयी झाले होते. हाच धागा पकडून भाजपने या मतदारसंघावर दावा केला आहे. बुधवारी इच्छुक उमेदवारांचे अर्जही भाजपने मागितले आहेत. युती धर्मानुसार ही जागा शिवसेनेकडे असल्याने आता सेनेलाच इथे उमेदवारी द्यावी, अशी आग्रही भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. दोन्ही पक्षांनी आग्रही भूमिका घेतल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

सत्तेत असताना भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना दुटप्पी वागणूक दिली, असा शिवसैनिकांचा आरोप आहे. भाजपचे नेते प्रत्युत्तर देताना ताकद वाढल्याचे सांगताना शिवसेनेची ताकद कमी झाली आहे, असाही दावा करतात. एकमेकांवर होत असलेल्या आरोप-प्रत्यारोपामुळे काटोलमध्ये युती तुटणार काय, यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपने आता दबावतंत्र वापरण्यास सुरुवात केली आहे. या जागेचा संबंध थेट लोकसभा निवडणुकीशी जोडला आहे. खासदारकीसाठी सेनेला गरज नाही काय, असेही विचारत आहेत.

बंडखोरीचा धोका

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेनेचा वापर करून विधानसभेत २०१४चा कित्ता गिरविणार, असे मतही मांडले. त्यासंदर्भात नेमका काय निर्णय घेण्यात आला हे अजूनही गुलदस्त्यात असले तरी भाजप किंवा शिवसेनेला ही जागा सुटल्यास दुसऱ्या पक्षातील इच्छुक बंडखोरी करणार, अशी शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे उन्हाळा भरात असताना होणारी ही निवडणूक ताप वाढविणारी ठरणार असेच एकूण चित्र आहे.

राकाँकडून अनिल देशमुख

काटोलच्या विधानसभा पोटनिवडणुकीवरून युतीत वाद असतानाच राष्ट्रवादी जोमाने कामाला लागली आहे. या मतदारसंघात परंपरेप्रमाणे राष्ट्रवादीकडून अनिल देशमुख ही निवडणूक लढणार आहेत. कार्यकर्त्यांकडून सलील देशमुख यांचे नावही समोर केले जात असले तरी अनिल देशमुख हेच उमेदवार राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पुतण्या अशीष देशमुख यांच्याकडून पराभव झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी आंदोलनांच्या माध्यमातून मतदारसंघातील आपला वावर कायम ठेवला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply