NewsSports

भारताचा गोलकीपर आकाश चिकटेवर दोन वर्षांची बंदी

51Views

नवी दिल्ली:-

राष्ट्रीय उत्तेजक विरोधी पथकाने (नॅशनल अॅन्टी-डोपिंग एजन्सी, नाडा) शुक्रवारी भारतीय हॉकी संघाचा गोलकीपर आकाश चिकटेवर दोन वर्षांची बंदी घातली आहे. बंदी असलेल्या औषधाचे सेवन केल्याने आकाश उत्तेजक चाचणीत दोषी आढळला. मात्र दुखापतीवरील (डाव्या पायावरील दुखापतीरम्यान) औषधोपचारादरम्यान अजाणतेपणी हे सेवन झाल्याचे आकाशने सिद्ध केले आहे, त्यामुळे त्याला दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा झाली. स्पर्धेचा कालावधी वगळताही खेळाडूंची उत्तेजक चाचणी होते. आशीच सरावशिबिरादरम्यान आकाशची चाचणी झाली होती, त्यात तो दोषी आढळला.

नाडाने इतर सहा दोषी खेळाडूंवर मात्र चार वर्षांची बंदी घातली आहे; कारण या चारही अॅथलिट्सना उत्तेजकांचे सेवन अजाणतेपणी केल्याचे सिद्ध करता आले नाही. चिकटेवरील बंदीचा कालावधी २७ मार्चपासूनचा आहे. २७ फेब्रुवारीला बेंगळुरूला त्याची उत्तेजक चाचणी झाली होती. त्याच्या शरीरात बंदी असलेले अॅनाबोलिक स्टेरॉइड आढळल्याचे चाचणीतून निष्पन्न झाले. गुरुवारी रात्री नाडाच्या वेबसाइटवर बंदी असलेल्या खेळाडूंची यादी अपलोड करण्यात आली.

-कळते, समजते

नाडा मात्र चिकटेला आणखी कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचे समजते. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप या ढाक्यात पार पडलेल्या स्पर्धा जिंकणाऱ्या भारतीय संघात चिकटेचा समावेश होता. आपण घेतलेले इंजेक्शन हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेतले होते, ज्याबद्दल आपल्याला काहीच कल्पना नव्हती हे आकाशने सिद्ध केले.

-बंदी असलेले इतर खेळाडू

मल्ल अमित, कबड्डीपटू प्रदीपकुमार, वेटलिफ्टर नारायणसिंग, अॅथलिट्स सौरभ सिंग, बलजीत कौर आणि सिमरजित कौर या उत्तेजकांमधील दोषी खेळाडूंवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.

-पुढे काय?

बंदी घातलेल्या प्रत्येक अॅथलिट्सना आपल्या शिक्षेविरोधात दाद मागण्याची संधी मिळेल. यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. ही बंदी त्यांना अँटी डोपिंग अपील्स पॅनल्सकडे मागायची आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply