News

भारतावर ५० अणुबॉम्ब टाकण्याची पाकची तयारी आहे का?: मुशर्रफ

33Views

नवी दिल्ली:

‘पाकिस्ताननं भारतावर एक अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला तर भारत२० अणुबॉम्ब टाकून अख्खा पाकिस्तान उद्ध्वस्त करून टाकेल. ते होऊ द्यायचं नसेल तर आम्हाला आधी ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील. पण आपली तशी तयारी आहे का?,’ असा सवाल पाकचे माजी अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी त्यांच्या सरकारला केला आहे.

यूएई इथं घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमध्ये युद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाककडून तर अणुहल्ल्याच्याही वल्गना होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुशर्रफ यांनी पाक सरकारला युद्धाच्या संभाव्य परिणामांची जाणीव करून दिली आहे. ‘पाकिस्ताननं एक अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला तर भारत २० अणुबॉम्ब टाकून पाकला बेचिराख करेल. भारताला ती संधी द्यायची नसेल तर त्यांनी २० अणुबॉम्ब टाकण्याआधी आपण त्यांच्यावर ५० अणुबॉम्ब टाकून हल्ला केला पाहिजे. पण आपली ती तयारी आणि क्षमता आहे का,’ असा प्रश्न उपस्थित करतानाच, मुशर्रफ यांनी दोन्ही देशांमध्ये अणुयुद्ध होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे.

‘भारतानं काश्मीरमधून हल्ला केल्यास पाकिस्तान सिंध व पंजाब प्रांतातून चाल करून भारताला धडा शिकवू शकते,’ अशी दर्पोक्तीही त्यांनी यावेळी केली.

ऑल पाकिस्तान मुस्लिम लीगचे प्रमुख असलेले मुशर्रफ सध्या यूएईमध्ये वास्तव्यास आहेत. सध्याचं राजकीय वातावरण पाकिस्तानात परतण्यासाठी पोषक असल्याचं सांगत त्यांनी मायदेशी परतण्याचे संकेत दिले आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply