News

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं एक वेगळाच विक्रम केला.

8Views

नवी दिल्ली:

एका मागोमाग एक शतकं ठोकणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं एक वेगळाच विक्रम केला आहे. विराट कोहलीनं गेल्या दोन वर्षांत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत १५ तर, सर्व प्रकारांतील क्रिकेट सामन्यांमध्ये मिळून एकूण २५ शतकं ठोकली आहेत. पाकिस्तानसह अनेक देशांच्या संपूर्ण संघालाही या दोन वर्षांत ही कामगिरी करता आलेली नाही.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. या कालावधीत विराटनं ठोकलेल्या शतकांची संख्या इतर अनेक संघांच्या खेळाडूंच्या एकूण शतकांपेक्षा जास्त आहे. मागील दोन वर्षांत एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंनी मिळून १४ शतकं ठोकली आहेत. बांगलादेशनं १३, वेस्ट इंडिजनं १२ तर श्रीलंका संघानं १० शतकं लगावली आहेत. याच काळात विराटनं एकट्यानं १५ शतकं केली आहेत.

कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्येही विराट धावांचा पाऊस पाडतोच आहे. २०१७ पासून विराटनं एकदिवसीय, कसोटी व टी-२० क्रिकेट सामन्यांमध्ये २५ शतकं ठोकली आहेत. हा आकडा पाकिस्तानच्या संपूर्ण संघानं केलेल्या शतकांपेक्षा अधिक आहे.

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांत सर्वाधिक शतकांचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या नावावर आहे. त्यानं ४९ शतकं ठोकली आहेत. विराटला हा विक्रम मोडण्यासाठी केवळ आठ शतकांची गरज आहे. एकदिवसी व कसोटी सामन्यांमध्ये मिळून कोहलीनं आतापर्यंत ६६ शतकं ठोकली आहेत. या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंग (७१) दुसऱ्या तर सचिन तेंडुलकर १०० शतकांसह पहिल्या स्थानी आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply