nagpurruralNews

मतदान केल्यानंतर खात्री करण्यासाठी व्हीव्हीपॅट चा वापर होणार

यंत्रणेकडून प्रसिद्धी व जनजागृती मोहीम सुरू

18Views

रामटेक:-

तालुका प्रतिनिधी:-ललित कनोजे

निवडणुकांमध्ये वापर करण्यात येत असलेले ईव्हीएम मशीन व त्यावर दिलेले मतदान अधिक विश्वासार्ह होण्यासाठी या मशीन सोबत व्हीव्हीपॅट नावाचे मशीन लावण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर प्रत्यक्षात मशीन कसे काम करते याबाबतची प्रसिद्धी व जनजागृती मोहीम यंत्रणेतर्फे राबविली जात आहे. मतदारांना या मशीन बाबत जागरूक करणे असा या मोहिमेचा हेतू आहे. रामटेकचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांच्या दालनात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 साठी ईव्हीएम मशीन व VVPAT संदर्भात प्रसिद्धी व जनजागृती मोहिमेअंतर्गत दि.2/01/2019 रोजी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ईव्हीएम मशीन व VVPAT संदर्भात प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. यापूर्वी मतदान केंद्रांवर मतदान केंद्राध्यक्ष यांचेकडे बॅलेट कंट्रोल मशीन व प्रत्यक्ष मतदाराला मतदान करण्यासाठी बॅलेट युनिट मशीन अशीच जोडणी करण्यात येत होती. आता या दोन मशीन सोबत VVPAT नावाचे अजून एक मशीन जोडले जाणार आहे. मतदाराने बॅलेट युनिटवर संबंधित ऊमेदवाराला मतदान केल्याची बटन दाबल्यानंतर VVPAT मशिनच्या स्क्रीनवर ज्या ऊमेदवाराला मतदान केले त्याचे नाव, बॅलेट युनिट वरील त्याचा अनुक्रमांक व निवडणूक चिन्ह या गोष्टी सात सेकंदापर्यंत मतदाराला दिसतील. याशिवाय केलेल्या मतदानाचा तपशील असलेली प्रिंट या मशीनमध्ये उपलब्ध राहील.कधी मतदाना बाबत वादविवाद झाल्यास न्यायालयीन प्रक्रियेसाठी याचा वापर होऊ शकेल. असे यावेळी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी सांगितले. गावागावात जाऊन या संदर्भात जनजागृती मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती यावेळी कट्यारे यांनी उपस्थितांना दिली. या मशीनच्या वापराने मतदारांनी केलेले मतदान हे अधिक विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे. जनजागृतीच्या या कार्यात सर्वच पक्ष व पत्रकारांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. या सभेला रामटेकचे तहसीलदार धर्मेश फुसाटे,राजस्व विभागाचे अन्य अधिकारी-कर्मचारी, रामटेक तालुक्यातील विविध पक्षांचे पदाधिकारी,कार्यकर्ते व पत्रकार मोठ्या संख्येत हजर होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply