News

मतदान नाही दारू वाटणाऱ्या पक्षाला.

30Views

 गडचिरोली:-

सर्वत्र लोकसभा निवडणुकांचे वेध लागले आहे. ग्रामीण भागातील मते आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी सर्वच पक्षांचे स्थानिक कार्यकर्ते कामाला लागले आहे. प्रचारादरम्यान दारूचाही महापूर असतो. हाच महापूर कायमचा कमी करण्यासाठी धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या दोनशे महिलांनी मतांसाठी दारू वाटणाऱ्या तसेच दारुविक्रेत्यांना साथ देणाऱ्या पक्षाला मतदान करणार नाही, असा ठराव एकमताने मंजूर केला.

महिलांनी दारूविक्री बंद करण्यासाठी कंबर कसली आहे. मुक्तिपथ गाव संघटनेद्वारे सातत्याने जनजागृती आणि अहिंसक कृती केली जात आहे. लोकसभा निवडणुकीला काहीच दिवस शिल्लक आहेत. यंदाही प्रचारासाठी गाव पातळीवर बैठका घेताना लोकांना दारूचे आमिष दाखविण्याचा प्रकार घडण्याचे संकेत दिसत आहेत. हा प्रकार टाळण्यासाठी मुरूमगाव येथील महिलांनी मंगळवारी बैठक घेऊन येत्या लोकसभा निवडणुकीत ज्या पक्षाचे स्थानिक नेते दारूविक्रेत्यांना साथ देतील त्या पक्षाला निवडणुकीत मतदान न करण्याचा ठराव एकमताने पारित केला. ग्रामसंघाच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत शेकडो महिला उपस्थित होत्या.

– अशी होणार गस्त
गावातील प्रत्येक मोहल्ल्यातील महिलांचे गट करण्यात आले आहे. प्रत्येक दिवशी दोन गट दिवस आणि रात्र गस्त घालतील. या व्यतिरिक्त बाजाराच्या दिवशी सर्वच गटाच्या महिला या गस्तीमध्ये सहभागी होतील. या सर्व गटांचे व्यवस्थापन मुक्तिपथ गावसंघटना करेल. या कामामध्ये पोलिसांची देखील मदत घेतली जाणार आहे. दारूच्या अवैध वाहतुकीला आळा घालण्यासाठी दारुपुरवठा करणाऱ्या वाहनांवर देखील या महिलांचे लक्ष असणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply