News

‘मतदाराने ‘टच’ न केल्यास राजकारणी बाद’

26Views

पैठण:-

‘राजकारण आणि कबड्डीत ‘टच’ या शब्दाला ला खूप महत्त्व असते. कबड्डीत ‘टच’ केल्यास खेळाडू बाद होतो, तर मतदारांनी निवडणुकीत उमेदवारासमोरील बटनावर ‘टच’ नाही केले, तर आमच्यासारखे राजकारणी राजकारणातून बाद होतात,’ असे प्रतिपादन राज्यमंत्री अर्जुन खोतकरयांनी केले.

येथील खरेदी विक्री संघाच्या मैदानावर सोमवारपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमात ते बोलत होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी, स्पर्धेचे आयोजक आमदार संदीपान भुमरे, विनोद घोसाळकर, नगराध्यक्ष सूरज लोळगे, जिल्हा परिषद सभापती विलास भुमरे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना विधानसभा अध्यक्ष बागडे म्हणाले, आजच्या बदलत्या जीवनशैलीत, कबड्डी सारख्या मैदानी खेळांना महत्त्व प्राप्त झाले असून युवकांनी कबड्डीसह व्यायामाकडे लक्ष देण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच, पैठण सारख्या ग्रामीण भागात राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी आमदार भुमरे यांचे अभिनंदन केले. उद्‌घाटन कार्यक्रमाला तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष अमर शिसोदे, आप्पासाहेब लघाने, शहादेव लोहारे, दादा बारे, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष नंदलाल काळे, साईनाथ सोलाट, कमलाकर एडके, भूषण कावसनकर, नंदकुमार पठाडे, नामदेव खराद, माणिक खराद, किशोर तावरे आदी सह अनेकांची उपस्थिती होती.

चार लाख ८७ हजारांची बक्षिसे

स्पर्धेतील प्रथम विजेत्या पुरूष संघाला आमदार चषकासह एक लाख एक रुपया, महिला संघाला चषकासह ७५ हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. द्वितीय पारितोषिक पुरूष ७१ हजार, महिला ५१ हजार, तृतीय विजेता पुरूष ५१ हजार आणि महिला ४१ हजार, चतुर्थ पारितोषिक पुरूष संघ ४१ हजार, तर महिला संघाला ३१ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय महिला-पुरूष दोन्ही संघाच्या अष्टपैलू, उत्कृष्ट चढाई व उत्कृष्ट पकड सादर करणाऱ्या खेळाडूंना प्रत्येकी पाच हजार याप्रमाणे ३० हजार रुपयांची वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. एकूण चार लाख ८७ हजार रुपयांची ही बक्षिसे देण्यात येणार आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply