News

मुख्यमंत्र्यांची समारोपालाही पाठ

11Views
नागपूर:-

साहित्यिका नयनतारा सहगल यांना मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून दिलेलं निमंत्रण मागे घेतल्यानंतर निर्माण झालेला वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संमेलनाकडे पाठ फिरविली असल्याची चर्चा आहे. संमेलनाच्या उद्घाटनाला न आलेले मुख्यमंत्री आता समारोपालाही उपस्थित राहणार नसल्याने साहित्यवर्तुळात ही चर्चा रंगली आहे.

नयनतारा यांना दिलेलं निमंत्रण अचानक रद्द केल्याने साहित्य संमेलनाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला होता. अनेक साहित्यिकांनी या निर्णयानंतर निषेध नोंदवत बहिष्कार घातला होता. स्वागताध्यक्ष मदन येरावार यांचं भाषण सुरू असतानाच, निमंत्रित प्रेक्षकांमध्ये उपस्थित असलेल्या तीन कवयित्रींनी नयनतारा यांचे मुखवटे घालून निषेध नोंदवला. यानंतर संमेलनाच्या मंडपात थोडा वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. या वादात गाजलेल्या संमेलनाच्या समारोपाकडे आता मुख्यमंत्र्यांनीही पाठ फिरविली असून ते समारोपाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.

यवतमाळ इथे होणाऱ्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार होते. मात्र दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक असल्याने मुख्यमंत्री फडणवीस साहित्य संमेलनाला हजेरी लावू शकणार नाहीत, असे भाजपकडून सांगण्यात आले होते. उद्घाटनाला येऊ न शकलेले मुख्यमंत्री आता समारोपाला येतील असेही सांगण्यात आले. मात्र आता मुख्यमंत्री समारोपालाही येत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. समारोपाच्या दिवशी म्हणजे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिवसभर मुंबईत आहेत. विविध स्थानिक कार्यक्रमांना ते उपस्थित राहणार असून दिवंगत माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या श्रद्धांजली सभेला उपस्थित राहणार असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply