News

मुलाच्या पार्थिवासाठी वडिलांची सरकारला साद.

6Views

नागपूर :-

सौदी अरेबियातील दम्माम येथे कर्मशिअल शीपवर झालेल्या अपघतात नागपुरातील लव शर्मा या युवकाचा मृत्यू झाला. अपघाताला आठ दिवस झाले तरीही शर्मा कुटुंबियांना त्यांच्या मुलाचे पार्थिवअद्याप मिळालेले नाही. त्यामुळे मुलाच्या पार्थिवासाठी सौदी अरेबियाव भारत सरकारकडे साद घालत आहेत. मात्र, चौकशीच्या नावाखाली सौदी अरेबियाने या युवकाचे पार्थिव परत दिलेले नाही. त्यामुळे नागपुरातील शर्मा कुटुबीयांवर मोठा आघात कोसळला आहे.

नागपुरातील क्लार्क टाऊन येथे राहणारे राजीव शर्मा यांचा मुलगा लव शर्मा हा सौदी अरेबिया येथील दम्मामच्या बहारी ड्राय बल्क कंपनीत मुख्य अधिकारी या पदावर कार्यरत होता. या कंपनीने मुंबईतील मेसर्स व्हीजीजी इंडिया या कंपनीच्या माध्यमाने लव शर्मा याला नियुक्त केले होते. बहारी बल्क या जहाजावर लव शर्मा १८ नोव्हेंबर २०१८ पासून मुख्य अधिकारी म्हणून कार्यरत होता.

दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी जहाजावरील कार्गो एरियात कंटेनर लोडिंग करीत असताना अपघात झाला. त्यात लव शर्मा याच्यासह दोघेजण गंभीर जखमी झाले. त्या तिघांनाही सौदी अरेबियातील रूग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तिथे त्यांचा मृत्यू झाला. त्या घटनेची माहिती नागपुरातील शर्मा कुटुंबीयांना सौदी अरेबियातील कंपनीने माहिती दिली. तरूण मुलाचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याचे कळताच शर्मा कुटुंबीयांवर आभाळ कोसळले. लव हा या कुटुंबाचा थोरला मुलगा आहे. मर्चंट नेव्हीत करिअर करण्याचा त्याने निर्णय घेतला होता. तर मुंबईतील कंपनीमार्फत त्याला सौदी अरेबियात नोकरी मिळाली होती. त्यामुळे शर्मा कुटुंबीय आनंदात होते. मात्र, अचानक लव शर्मावर काळाने झडप घातली.

मुलाच्या मृत्यूने हादरलेल्या शर्मा कुटुंबीयांना मुंबईतल मेसर्स व्हीजीजी कंपनी लव शर्माचे पार्थिव मुंबईत आणणार असल्याटेचे कळविले होते. त्यासाठीचा सर्व खर्च व प्रशासकीय प्रक्रिया कंपनीकडून करण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. त्यामुळे राजीव शर्मा हे मुंबईत दाखल झाले. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून ते मुंबईत मुलाच्या पार्थिवाची प्रतिक्षा करीत आहे. सौदी अरेबियाच्या सरकारने कार्गो जहाजात झालेल्या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्याची चौकशी पूर्ण झाल्याशिवाय लव शर्माचे पार्थिव सोपवणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे राजीव शर्मा यांनी परराष्ट्र मंत्रालय आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना याप्रकरणात मध्यस्थी करण्याची विनंती केली आहे. माझ्या मुलाचा सौदी अरेबियात अपघाती मृत्यू झाला. त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. तेव्हा सौदी अरेबियाने अपघाताची चौकशी करावी, आवश्यक ते पुरावे घ्यावेत आणि माझ्या मुलाचे पार्थिव भारतात पाठवावे. त्यासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मध्यस्थी करावी, अशी विनंती शोकाकूल राजीव शर्मा यांनी ‘मटा’शी बोलताना केली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply