nagpurruralNews

मेट्रोच्या एलआयसीपर्यंतच्या उड्डाणपुलाला महासभेची मंजुरी.

46Views

 नागपूर:-

नागरिकांच्या तीव्र विरोधानंतर गड्डीगोदाम चौक ते पाटणी ऑटोमोबाइल्सपर्यंतचा उड्डाणपूल एलआयसी चौकापर्यंत उतरविण्यास महासभेने मंगळवारच्या महासभेत मंजुरी प्रदान केली. यासंदर्भात महामेट्रोने सुधारीत प्रस्ताव मनपाकडे सादर केला होता. यासाठी तेथील नागरिक, दुकानदार आदींची अधिकाऱ्यांसह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार उड्डाणपुल व रॅम्पची जागा बदलण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

नव्या प्रस्तावात पाटणी ऑटोमोबाईल्स ते एलआयसी चौकापर्यंत प्रस्तावित रॅम्पच्या दोन्ही बाजूस ५.५० मीटर रूंदीचा सर्व्हिस रोड व १.५० मीटर रूंदीच्या फुटपाथसह रॅम्प व उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याचे १४ फेब्रुवारीच्या बैठकीत ठरल्याचे मेट्रोच्या प्रस्तावात नमूद आहे. त्यानुसार हा रस्ता रूंदीकरण करणे आवश्यक आहे. याकरिता विकास योजनेतील प्रस्तावित ३० मीटर रूंदीचा रस्ता ३३.०० मीटर रूंदीचा प्रस्तावित करण्याकरीता फेरबदलाचा प्रस्ताव महामेट्रोतर्फे मनपास सादर केलेला आहे. रस्त्यांची रूंदी वाढविल्यास मेट्रो रेल्वेतर्फे या ठिकाणी प्रस्तावित असलेले उड्डाणपूल रॅम्प, फूटपाथ, सर्व्हिस रोड आदी विकासकामे करणे मेट्रोला सोयीचे होईल. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ३७(१)अन्वये फेरबदल प्रस्तावित करण्यात आले आहेत. या प्रस्तावाची संपूर्ण वैधानिक कार्यवाही पूर्ण केल्यानंतर प्रस्ताव शासन मान्यतेकरिता सादर करण्यात येईल. यासाठी मनपा महासभेत मंजुरी प्राप्त झाल्यानंतर फेरबदलाची सूचना राजपत्रात व वर्तमानपत्रात आक्षेप व हरकतीवर योग्य निर्णय घेवून व त्यानंतर प्रस्ताव राज्य शासनास मंजुरीस्तव पाठविण्यात येणार आहे. त्याकरिता मनपा आयुक्तांना अधिकार प्रदान करण्यासाठी मंजुरी देण्याचा प्रश्न विचारात घेण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांनी या प्रस्तावाबाबत सभागृहात मत व्यक्त केले. त्यानंतर सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी या प्रस्तावास झालेल्या चर्चेच्या अधीन राहून सभागृहाने मंजुरी द्यावी, अशी विनंती केली. त्यानंतर या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात आली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply