News

मेळघाटात पट्टेदार वाघाचा मृत्यू

17Views

अमरावती:-

मेळघाटातील चिखलदरा वनपरिक्षेत्राच्या मोथा नियतक्षेत्रात पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. वृद्धापकाळाने या वाघाचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असले तरी शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. चार दिवसांपूर्वीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका वाघाची कातडी जप्त केली होती.

मोथा नियतक्षेत्रात शुक्रवारी गस्तीवर असताना वनरक्षक पी. पी. साबळे आणि वनमजूर आमऱ्या तुकोजी निखाडे यांना एका कपारीत एक मृत वन्यप्राणी दिसून आला. त्यांनी याबाबतची माहिती क्षेत्र सहायक सी. बी. खेरडे यांना दिली. घटनेची माहिती पूर्व मेळघाटच्या उपवनसंरक्षक कार्यालयाला देण्यात आली. सहायक वनरक्षक तथा प्रभारी उपवनसंरक्षक सानप, विभागीय वन अधिकारी सैपून इमाम शेख, परतवाड्याचे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यासह सायंकाळी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केल्यावर मृत वन्यप्राणी वाघ असल्याचे आढळले. राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सूर्यास्तानंतर वाघाचे शवविच्छेदन करता येत नसल्याने त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. शनिवारी या वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर वाघाच्या मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती वन विभागाने दिली आहे.

वाघाच्या कातडीसह आठ अटकेत

मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी ३१ डिसेंबरच्या रात्री परतवाडा-चिखलदरा मार्गावर भिलखेडा फाट्यानजीक वाघाच्या कातडीसह आठ जणांना अटक केली होती. त्यातील सहा आरोपींची वन कोठडी घेण्यात

आली आहे. आरोपींपैकी काही जण मध्य प्रदेशातील मांजरी कापडी येथील रहिवासी आहेत. वाघाची कातडी जप्त करण्यात आली आहे. तो वाघ मेळघाटातील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेचा वन विभागाचे अधिकारी कसून तपास करीत असून आणखी काही माहिती त्यांच्या हातात येण्याची शक्यता आहे.

अडीच वर्षांपूर्वीच्या शिकारीचे रहस्य उलगडले

मध्य प्रदेश सीमेला लागून मेळघाटातील चौराकुंडचे जंगल आहे. या जंगलात मध्य प्रदेशातील शिकारी वन्यजीवांच्या अवयवांची तस्करी करतात. दोन स्थानिक शिकाऱ्यांना अटक केल्यानंतर यावर शिक्कामोर्तब झाले आहे. धारणीपासून ३५ किमी अंतरावरील मालूर (वन) येथून यांना अटक करण्यात आली असून अशोक भोजराज खडके व ओंकार भय्यालाल कास्देकर (४२) अशी त्यांची नावे आहेत. यांच्या चौकशीदरम्यान अडीच वर्षांपूर्वी झालेल्या वाघाच्या हत्येचे रहस्य उलगडले आहे. मालूर येथील दादू येवले याच्या घरातून वन विभागाने वाघाच्या शिकारीसाठी उपयोगात येणाऱ्या साहित्य जप्त केले. याशिवाय अवैधपणे संग्रहित केलेले चार दात, चार सांबराची शिंगे आणि वाघाची दाढ जप्त करण्यात आली. घरावर छापा पडल्याचे समजताच येवले फरार झाला. दरम्यान, अशोक खडके आणि ओंकार कास्देकर यांनी सुमारे अडीच वर्षांपूर्वी चौराकुंडच्या जंगलातील दक्षिण चौपन बीटच्या ६०७ वनखंडाच्या जंगलात वाघाची शिकार केल्याचे कबुल केले आहे. अंजन झडप नावाच्या वर्तुळातील हे जंगल आहे. वाघाने वासराची शिकार केल्यानंतर विष टाकून त्याला ठार मारण्यात आले होते. दोन आरोपी सध्या एफसीआरमध्ये असून एक फरार आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता सिपना वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक मिलींद तोरो चौकशी करीत आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply