News

मोहालीत झालेल्या चौथ्या वनडेत ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव.

12Views

मोहाली:-

मोहालीतील चौथ्या वनडे सामन्यात अखेरच्या षटकांमध्ये तडाखेबंद फलंदाजी करून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देणाऱ्या अॅश्टन टर्नरविरोधातील डीआरएस अपीलनंतर दिलेल्या निर्णयावर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डीआरएसच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येतो, असं त्यानं म्हटलं.

भारतानं ३५८ धावांचा डोंगर उभा केला. पण ऑस्ट्रेलियानं चार गडी राखून धावांचा डोंगर पार करत विजय मिळवला. पण विजयाचा शिल्पकार ठरलेला अॅश्टन टर्नरविरोधातील डीआरएस अपीलनंतर दिलेल्या निर्णयावर विराट कोहलीनं नाराजी व्यक्त केली. टर्नरनं ४३ चेंडूंमध्ये ८४ धावा काढून ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाच्या डावाचं ४४वं षटक चहलनं टाकलं. चहलनं टाकलेला चेंडू टप्पा घेऊन बाहेरच्या दिशेने जात यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या हातात विसावला. त्यानंतर त्यानं टर्नरला यष्टिचित करण्याचा प्रयत्न केला आणि जोरदार अपील केलं. तर स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या पंचांनी तिसऱ्या पंचांकडे इशारा केला. टर्नरचा पाय क्रीजमध्ये असल्याचं रिव्ह्यूमध्ये स्पष्ट दिसलं. त्यामुळं यष्टिचित होण्याचा प्रश्नच नव्हता. पण झेलबाबत म्हणाल तर, कसला तरी आवाज झाल्याचं वाटत होतं. चेंडू बॅटच्या पुढे गेल्यानंतर स्पाइक येत असल्याचं स्क्रीनवर दिसलं. मात्र, पंचांनी वाइड चेंडू दिला. या निर्णयावर विराटनं तीव्र नाराजी व्यक्त केली. डीआरएस निर्णय आम्हा सर्वांसाठी धक्का देणारा ठरला. जवळपास प्रत्येक सामन्यानंतर यावर चर्चा होऊ लागली आहे. डीआरएसच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसू लागला आहे. तो क्षण सामन्यासाठी अत्यंत महत्वाचा असा होता, अशी प्रतिक्रिया विराटनं सामना संपल्यानंतर दिली.

याआधी रांचीत झालेल्या सामन्यात डीआरएसची चूक दिसून आली होती. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच बाद झाल्यानंतर बॉल – ट्रॅकिंगचा वाद झाला होता. कुलदीप यादवनं टाकलेला चेंडू लेग स्टम्पच्या रेषेवर जात होता. बॉल ट्रॅकिंगमध्ये मात्र, चेंडू मिडल आणि लेग स्टम्पवर आहे असं दिसत होतं. फिंच दोन्ही बाजूंचा विचार केला तरी बाद होता. या चुकीनं माजी क्रिकेटपटूंचंही लक्ष वेधलं. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज शेन वॉर्न आणि दिग्गज फलंदाज मार्क वॉ यानंदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply