News

यूपी विधानसभा निवडणुकीत प्रियांका मुख्यमंत्रिपदाचा चेहरा?

26Views

लखनऊ :-

काँग्रेसच्या महासचिव आणि उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियांका गांधी वाड्रा यांच्या उत्तर प्रदेशातील हाय प्रोफाइल एंट्रीद्वारे गेल्या ३० वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेस पक्षाने आपला राजकीय वनवास संपण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे. प्रियांकांवर सोपवलेली जबाबदारी पाहता, तसेच त्यांचा राजकीय वावर पाहता २०२२ मध्ये उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार म्हणून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली आहे. आज होणाऱ्या प्रियांकांच्या रोड शोपूर्वी उत्तर प्रदेशातील काही नेत्यांनी याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

२०१७च्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशच्या एकूण ४०३ जागांपैकी काँग्रेसला फक्त ७ जागा मिळाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून पुढे आल्यास पक्षाला राजकीयदृष्ट्या संजीवनी मिळू शकेल अशी काँग्रेस नेत्यांना आशा आहे.

पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह

१९८९नंतर उत्तर प्रदेशातील सत्ता विविध कार्यकालामध्ये समाजवादी पक्ष, बहुजन समाजपक्ष आणि भाजपच्या हाती राहिली आहे. अशात देशातील सर्वात मोठ्या राज्यातील लोकसभा आणि विधानसभेच्या जागांवर पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी संपूर्ण उत्तर प्रदेश राज्यात प्रियांका गांधी वाड्रा यांचाच चेहरा काम करेल असे काँग्रेसला वाटते. पक्षाच्या या रणनीतीमुळे कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. लखनऊमधील रस्त्यांवर लागलेल्या प्रियांकांच्या पोस्टर्सवरून हा उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे.

भाजपशी थेट लढाई

प्रियांकांचा राजकीय वावर पाहता त्या आतापर्यंत उत्तर प्रदेशातच सक्रिय असलेल्या दिसतात. गेल्या काही वर्षांमध्ये त्या आई सोनिया गांधी यांच्या रायबरेली या मतदार संघात काम करताना दिसल्या. त्यावेळी त्यांनी योगी सरकारला आपल्या टीकेचे लक्ष्य केले. त्या सतत भाजपवर हल्लाबोल करत असल्याने नक्कीच काँग्रेस पक्ष त्यांना महत्त्वाची जबाबदारी देईल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दररोज १२ तासांच्या महामंथनात सहभाग देणार

सोमवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आलेल्या प्रियांकांनी कार्यकर्त्यांना तीन दिवसांमध्ये दररोज १२ तास भेटण्याचा संकल्प केला आहे. या व्यतिरिक्त प्रियांकांच्या या दौऱ्यात एक रोड शो आणि लखनऊमध्ये एका सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या दौऱ्याबाबत पक्षातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांमध्ये प्रियांका आणि ज्योतिरादित्य सिंधिया आपला प्रभाव असलेल्या क्षेत्रांतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेणार आहेत.

पक्षापासून दूर गेलेल्या सवर्णांचे मन वळवणार

पक्षापासून दूर गेलेल्या सवर्ण समाजाला पुन्हा पक्षाशी जोडण्याचे काम प्रियांकांना करावे लागणार आहे. आपल्या दौऱ्यात प्रियांका ब्राह्मण, राजपूत समाजांवर विशेष लक्ष केंद्रीत करणार आहेत. यासाठी पक्षाने एक विशेष टीम तयार केली आहे. या टीमवर पक्षापासून दूर गेलेल्या ब्राह्मण आणि राजपूत समाजाला पुन्हा जोडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply