News

रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका.

9Views

दिल्ली: 

संयुक्त राष्ट्रसंघात मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी जाहीर करण्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला. चीनने या प्रस्तावाला विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव मंजूर होऊच शकला नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मोदी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर सडकून टीका केली आहे. अनेक राष्ट्रप्रमुखांना आलिंगन देण्याची आलिंगननीती अखेर अपयशी ठरली आहे असं विधान सुरजेवाला यांनी केलं आहे.

मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात भारताने मांडला होता. या प्रस्तावाला इंग्लंड,फ्रान्स आणि अमेरिकेने पाठिंबा दिला होता. पण त्याचवेळी आपल्या व्हेटो मताचा फायदा घेत चीनने या प्रस्तावाला विरोध केला. परिणामी हा प्रस्ताव पारित होऊ शकला नाही आणि भारताची खेळी अपयशी ठरली. या घटनेवर सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून टीका केली आहे. ‘ भारताची दहशतवादविरोधी लढाईला चीन-पाकिस्तानच्या जोडगोळीने धक्का पोहोचवला आहे. ५६ इंचांची आलिंगननीती आणि झुला दिल्यानंतरही चीन-पाकिस्तान भारताकडे वाकड्या नजरेने पाहत आहेत. एका अपयशी मोदी सरकारची पराभूत परराष्ट्र नीती समोर येते आहे’ असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान मसूद अजहरचे समर्थन करणारी भूमिका घेणाऱ्या चीनविरोधात अमेरिका मोर्चेबांधणी करते आहे. या निर्णयामुळे चीनला आंतरराष्ट्रीय राजकारणात खूप मोठा धक्का पोहोचू शकतो.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply