News

राज्यात ११ हजार ९३२ बालमृत्यू

10Views

मुंबई  :-

राज्यातील कुपोषित बालकांचा प्रश्न व त्यामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचा गंभीर प्रश्न अद्याप सुटलेला नाही. जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात राज्यात ११ हजार ९३२ बालमृत्यूची नोंद झाली आहे. लहान मुलांच्या मृत्यूचे हे प्रमाण धक्कादायक असताना तीव्र कमी वजनाच्या बालकांचेही प्रमाणही वाढते आहे. या मुलांकडे जर वेळीच लक्ष देण्यात आले नाही तर त्यांनाही मृत्यूच्या खाईत ढकलल्यासारखे होणार आहे, असे आकडेवारीमधून स्पष्ट दिसते.

एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या माहितीनुसार, दगावलेली मुले शून्य ते पाच वयोगटातील आहेत. यामध्ये शून्य ते एक वर्ष वयोगटातील ९ हजार ३७९ मुलांचा, तर १ ते ५ वर्षे वयोगटातील २ हजार ५५३ मुलांचा समावेश आहे. कुपोषित मुलांसाठी पोषण आहाराच्या योजना आखल्या जातात, तत्पर वैद्यकीय सुविधा पुरवल्या जात असतील तर हे बालमृत्यू रोखण्यास सरकार अपयशी का ठरते, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

जानेवारी ते सप्टेंबर या महिन्यामधील उपलब्ध आकडेवारीचा अभ्यास केला तर सप्टेंबर २०१ मध्ये कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसते. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांची पोषण स्थिती काळजी करायला लावणारी आहे. एकूण वजन घेतलेल्या मुलांचे प्रमाण ५८ लाख ७७ हजार २८१ इतके आहे, त्यात साधारण श्रेणीतील ५२ लाख ३५ हजार ९९४ मुले आहेत तर मध्यम कमी वजनाच्या मुलांमध्ये ५ लाख ५२ हजार ९२४ मुलांचा समावेश आहे. तीव्र कमी वजनाच्या गटात ८८ हजार ३६३ मुले येतात. मध्यम आणि तीव्र कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण ६ लाख ४१ हजार २८७ आहे. गडचिरोली, नंदूरबार य़ेथे कुपोषण आणि बालमृत्यूच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या खोज या संस्थेच्या बंडू साने यांनी बालमृत्यूच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची निकड व्यक्त केली. न्यायालयाकडून सातत्याने निर्देश दिले जातात, तरीही मुलांचे मरण्याचे व कुपोषणाचे प्रमाण कमी होत नाही. सक्षम आरोग्यसेवा मिळत असतील तर बालमृत्यू कमी व्हायला हवेत, असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. यासंदर्भात महिला बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

अंगणवाड्यांची घडी विस्कळीत

आरोग्याच्या समस्यांची अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून नोंद घेतली जात होती.

कुपोषित मुलांसाठी गावपातळीवर सरकारमार्फत ग्राम बालविकास केंद्र ही योजना राबवण्यात येत होती. ही योजना बंद करण्यात आली, अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये कपात, आशा सेविकेला दुय्यम स्थान दिल्याने प्राथमिक पातळीवर असलेली आरोग्ययंत्रणा खिळखिळी केल्याचा आक्षेप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या शुभा शमीम यांनी नोंदवला आहे.

चौकट एक..

जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ दरम्यान झालेल्या बालमृत्यूची माहिती

महिना — नवजात मृत्यू — बालमृत्यू – एकूण मुलांचे मृत्यू

जानेवारी – १११८ -३०४ – १४२२

फेब्रवारी – ८९७ – २६३ – ११६०

मार्च – ९०३ – २६१ – ११६४

एप्रिल – ८५९ -२५३ -१११२

मे – ९१८ – २२६ – ११४४

जून – १००५- २५६ – १२६१

जुलै – १०१६ – ३०४ -१३२०

ऑगस्ट – १३४५ – ३०१ – १६४६

सप्टेंबर – १३१८ – ३८५ -१७०३

एकूण – ९३७९ – २५५३ – ११९३२

सप्टेंबर २०१८ मधील कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण

एकूण वजन घेतलेली मुले – ५८७७२८१

– साधारण श्रेणी -५२३५५९९४

मध्यम कमी वजनाची बालके – ५५२९२४

तीव्र कमी वजनाची बालके – ८८३६३

एकूण कमी वजनाची बालके (मध्यम तीव्र)- ६४१२८७

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply