News

राज बब्बर, अझरुद्दीन लोकसभेसाठी मुंबईतून इच्छुक?

18Views

मुंबई:-

लोकसभा निवडणुकीसाठी काही महिनेच उरले असताना काँग्रेसमधील नेत्यांनी आपल्या मतदारसंघाची शोधाशोध सुरू केली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि अभिनेते राज बब्बर आणि माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन यांना मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.

राज बब्बर यांनी २००९ ची लोकसभा निवडणूक आग्रा मतदारसंघातून लढवली होती आणि विजयी झाले होते. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत बब्बर यांचा माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग यांनी गाझियाबाद मतदारसंघातून पराभव केला होता. उत्तर प्रदेशमधील राजकीय घडामोडी पाहता बब्बर सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात असल्याची चर्चा आहे.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी राज बब्बर आणि अझरुद्दीनच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अझरुद्दीन यांनी मुंबईतून निवडणूक लढवण्याबाबत आपल्याशी संपर्क साधला होता. त्यांच्या उमेदवारीबाबत काँग्रेस नेतृत्व निर्णय घेणार असल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले. मागील लोकसभा निवडणुकीत मुंबई काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नव्हती. यंदा मात्र, काँग्रेसला अनुकूल परिस्थिती असून पक्ष उल्लेखनीय कामगिरी करेल असा विश्वास निरुपम यांनी व्यक्त केला.

उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातून याआधी प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवली होती. २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या पूनम महाजन यांनी प्रिया दत्त यांचा पराभव केला होता. यंदा प्रिया दत्तच्या यांच्या उमेदवारीला काँग्रेसमधून विरोध होत असून स्वत: प्रिया यांचीदेखील निवडणूक लढवण्याची इच्छा नसल्याची चर्चा आहे. त्याऐवजी कृपाशंकर सिंह, बाबा सिद्दीकी यांची नावे चर्चेत आहेत. तर उत्तर-पश्चिम मतदारसंघातून निरुपम स्वत: निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. या मतदारसंघातून दिवंगत काँग्रेस नेते गुरुदास कामत निवडणूक लढले होते. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेचे गजानन किर्तीकर यांनी त्यांचा पराभव केला होता. निरुपम यांनी २०१४ मध्ये उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली होती. मात्र, भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी त्यांचा पराभव केला होता. दक्षिण-मध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, भालचंद्र मुणगेकर आणि हुसैन दलवाई यांची नावे चर्चेत आहेत. दक्षिण मुंबईतून मिलिंद देवरा यांची उमेदवारी निश्चित समजली जात आहे. त्यामुळे मुंबईतून निवडणूक लढवू पाहणाऱ्या काँग्रेस नेत्यांना कोणता मतदारसंघ द्यायचा हा प्रश्न काँग्रेसमध्ये विचारला जात आहे.

मुंबई काँग्रेसमध्ये काही महिन्यांपूर्वीच गटबाजी उफाळून आली होती. संजय निरुपम यांच्याविरोधात काहींनी थेट राहुल गांधीकडेही तक्रार दाखल केली होती. त्यानंतर राहुल यांनी निरुपम यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे निवडणुकीत काँग्रेससमोर पक्षांतर्गत गटबाजीचे आव्हान असणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply