News

राफेल प्रकरण पुन्हा कोर्टात

19Views

नवी दिल्ली:-

राफेल करार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला क्लीन चिट दिल्यानंतरही हा वाद शमण्याची चिन्हे नाहीत. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, यासाठी माजी मंत्री यशवंत सिन्हा व अरुण शौरी यांच्यासह प्रसिद्ध विधीज्ञ प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल केली आहे.

राफेल करारात घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप असून त्याची माहिती जनतेसाठी खुली करण्याच्या मागणीसाठी न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या प्रकरणी १४ डिसेंबर रोजी सुनावणी होऊन खंडपीठानं सर्व याचिका फेटाळून लावल्या. राफेल करारात कोणतीही अनियमितता नसून हा करार देशासाठी आवश्यक असल्याचं मत खंडपीठानं नमूद केलं होतं. त्यामुळं विरोधकांना झटका बसला होता.

असं असलं तरी विरोधक घोटाळ्याच्या आरोपांवर ठाम आहेत. ‘राफेल करारावर न्यायालयानं दिलेल्या निर्णयामध्ये अनेक त्रुटी आहेत. हा निर्णय सरकारनं न्यायालयात दिलेल्या चुकीच्या माहितीवर आधारलेला आहे. ही माहिती सरकारनं कुणाच्याही सही शिक्क्याशिवाय बंद लिफाफ्यात सादर केली होती. हा नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंग आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे,’ असं पुनर्विचार याचिकेत नमूद करण्यात आलं आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply