News

राम मंदिर कायद्यावर संघ ठाम : भय्याजी जोशी

17Views

नागपूर :-

अयोध्येतील राम मंदिरासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच अध्यादेश आणण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मात्र, केंद्र सरकारने राम मंदिरासाठी तातडीने कायदा करावा, या मागणीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठाम आहे, असे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी मंगळवारी नागपुरात स्पष्ट केले.

धरमपेठ विज्ञान कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवाच्या उद्घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना भय्याजी जोशी यांनी राम मंदिराबाबत संघाच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘पंतप्रधान मोदी नेमके काय म्हणाले ते मला माहिती नाही. परंतु, राम मंदिरासाठी कायदा करावा ही आमची मागणी आहे. या मागणीवर आम्ही ठाम आहोत,’ असे जोशी यांनी सांगितले.

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी ‘लडेंगे और अडेंगे,’ अशी घोषणा केली होती. तर पंतप्रधान मोदी यांच्या विधानानंतर संघ आणि मोदी सरकार यांच्यातील राम मंदिरावरील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यासंदर्भात विचारले असता जोशी म्हणाले, ‘राम मंदिरासाठी आम्ही आग्रही आहोत आणि प्रसंगी त्यासाठी सरसंघचालकांनी घोषित केल्याप्रमाणे ठामदेखील राहू.’

संघाच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यायालयीन प्रक्रियेला महत्त्व दिल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्येही आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नागपुरातील हुंकार सभेत केंद्र सरकारला राम मंदिरासाठी कायदा करण्याचे थेट निर्देश दिले होते. परंतु, त्याची दखलही पतंप्रधान मोदी यांच्याकडून घेण्यात आलेली नसल्याची प्रतिक्रिया संघगोटातून व्यक्त होत आहे.

दरम्यान, बुधवारी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत नागपुरात एका जाहीर कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधानांच्या ताज्या वक्तव्यावर सरसंघचालक काय प्रतिक्रिया देतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply