Uncategorized

राहुल गांधींना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

19Views

नवी दिल्ली:-

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याबाबात अनुद्गार काढल्याचे सांगत, राष्ट्रीय महिला आयोगानं राहुल गांधी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी घाबरले असून आपल्या बचावासाठी त्यांनी महिला मंत्र्याला पुढे केलं आहे’, असं वक्तव्य राहुल यांनी राजस्थानमधील एका सभेत बोलताना केलंय. राहुल यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली होती. राहुल गांधी यांचे वक्तव्य अपमानजनक असल्याचं पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही म्हटलं होतं.

राहुल गांधी यांनी पुरुषप्रधान मानसिकतेतून हे वक्तव्य केल्याचं म्हणत, आयोगानं राहुल यांना नोटीस बजावली आहे. राहुल गांधी महिलांना कमकुवत मानतात का, असा सवाल करत, राहुल गांधींचं वक्तव्य महिलांची निंदा करणारं आणि अपमानजनक असल्याचं आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांना नोटीस पाठवून या वक्तव्यामागं त्यांचा काय उद्देश आहे, याचं आयोगानं स्पष्टीकरण मागवलं असल्याचंही शर्मा म्हणाल्या.

राहुल गांधी गेले काही दिवस राफेल मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत आहेत. त्यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान मोदी यांनी ट्विटद्वारे पलटवार केल्यानंतर राहुल यांनीही हल्लाबोल केला. ‘आमच्या संस्कृतीत महिलांचा सन्मान घरातूनच सुरू होतो’, असं सांगत, ‘पंतप्रधान मोदी यांनी हा मुद्दा भलत्याच दिशेकडे भरकटवू नये आणि उत्तर द्यावे’, असं आवाहन राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना केले आहे.
राफेल करारात बदल करण्यात आले त्यावेळी संरक्षण मंत्री हवाई दलाने आक्षेप नोंदवले होते का?, या माझ्या प्रश्नाचे उत्तर ‘होय’ किंवा ‘नाही’ असे द्या, असेही त्यांनी ट्विटद्वारे वचारले होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply