News

राहुल-पंड्या प्रकरण लोकपालांकडे सोपवणार.

11Views

नवी दिल्ली :-

हार्दिक पंड्या आणि के.एल. राहुल यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बीसीसीआयने त्यांना निलंबित केले खरे, पण नंतर ते निलंबन मागे घेण्यात आले. आता नव्याने नियुक्त केलेले लोकपाल डी.के. जैन यांच्या देखरेखीखाली या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या प्रशासकांच्या आज होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

एका प्रसिद्ध टीव्ही शोमध्ये पंड्या आणि राहुल यांनी महिलांविषयक वादग्रस्त विधान करून सर्वांचा रोष ओढवून घेतला होता. बीसीसीआयने त्यांच्यावर निलंबनाची कारवाईही केली होती. कालांतराने ती मागेही घेण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेले लोकपाल जैन या प्रकरणाची चौकशी करून निर्णय घेतील.

प्रशासक समितीचे प्रमुख विनोद राय यांनी म्हटले आहे की, लोकपालांची नियुक्ती केल्यानंतर प्रशासकांची ही पहिलीच बैठक असेल. अनेक विषयांवर आम्ही चर्चा करणार आहोत. राय यांनी राहुल आणि पंड्या यांचे प्रकरण लोकपालांकडे सोपविण्यात येईल का, याचे संकेत मात्र दिलेले नाहीत. जैन यांनी मंगळवारी असे स्पष्ट केले होते की, प्रशासक समितीकडून आपल्याला कोणते प्रकरण सोपवले जाते याची प्रतीक्षा आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात असताना पंड्या आणि राहुल यांच्या त्या टीव्ही शोमधील वक्तव्यामुळे खळबळ उडाली होती. तेव्हा त्यांना ऑस्ट्रेलिया दौऱ्याहून मायदेशी पाठवण्यात आले होते. आज होणाऱ्या या बैठकीत प्रशासक समितीतील नवे सदस्य लेफ्टनंट जनरल रवी थोडगेही उपस्थित राहणार आहेत. ही त्यांची पहिलीच बैठक असेल. याआधी, त्यांची केवळ दूरध्वनीवरून इतर सदस्यांशी चर्चा झाली होती. त्यामुळे विनोद राय, डायना एडलजी आणि थोडगे अशी त्रिसदस्यीय समिती आज बैठकीला असेल.

या बैठकीत भारत-पाक मुद्द्यावरून बीसीसीआयने आयसीसीला लिहिलेले पत्र आणि त्यावर आयसीसीने दिलेले उत्तर यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, २३ मार्चपासून सुरू होत असलेल्या आयपीएलबाबतही चर्चा होईल.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply