News

रिलायन्स-डसॉल्टची जमीन एचएएलला द्यावी

16Views

नागपूर:-

राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर सरकारने उद्योगपती अनिल अंबानी यांच्या कंपनीचा ऑफसेट करार रद्द करावा आणि मिहानमधील १०५ एकर जमीन हिंदुस्थान एअरोनॉटिक्सला द्यावी, अशी मागणी भाजपमधून काँग्रेसवासी झालेले माजी आमदार आशिष देशमुख यांनी केली.

डसॉल्ट-रिलायन्सचा करार रद्द करण्याच्या मागणीसाठी आशिष देशमुख यांनी मिहानमधील रिलायन्स-डसॉल्ट कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्प स्थळाजवळ मोठाले फलक झळकवून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. राफेल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्याने होत आहे. अंबानी यांच्या कंपनीला चुकीच्या पद्धतीने ऑफसेट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे हा करार रद्द करून एचएएलच्या माध्यमातून मिहानमध्ये सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प सुरू करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

अनिल अंबानींच्या कंपनीला हे काम मिळावे, यासाठी राज्यातील फडणवीस सरकारचेही प्रयत्न होते. अंबानी यांच्या कंपनीला काही अनुभव नसताना काम मिळाल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यांची कंपनी कर्जामुळे डबघाईस आली आहे. त्यामुळे विमानांची निर्मिती करणे कठीण जाईल. पाच दशकांपासून एचएएल यांनी मिग, सुखोई, मिराजसारख्या लढाऊ विमानांसाठी उल्लेखनीय कामगिरी केली. सरकारची ही कंपनी राफेल विमानांसाठी अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकते. एचएएलने हा प्रकल्प उभारल्यास नागपूर-विदर्भातील तरुणांना चांगली संधी उपलब्ध होईल. त्यामुळे अंबानींच्या कंपनीशी असलेला करार सरकारने तातडीने रद्द करून ही जमीन ताब्यात घ्यावी, असे त्यांनी नमूद केले.

मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्कील इंडिया, मॅग्नेटिक महाराष्ट्र आदी उपक्रमांचे नागपूरला काहीच फलित मिळाले नाही. रोजगाराच्या संधी असतानादेखील या भागातील तरुण वंचित आहेत. गेल्या चार-साडे चार वर्षात भाजप सरकारने पोकळ आश्वासने देऊन तरुणांसह सर्वसामान्यांची दिशाभूल केली. रोजगारासाठी वैदर्भीय तरुणांना बाहेर जावे लागत आहे. या प्रश्नावर सरकार पूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोपही आशिष देशमुख यांनी केला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply