News

लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा.

6Views

मुंबई: 

लोकसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली असून, प्रचाराची रणनितीही ठरवण्यात येत आहे. असं असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल, मंगळवारी रात्री उशिरा ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीत प्रचाराचा धुरळा कोल्हापुरातून उडवून देण्याचं निश्चित करण्यात आल्याचं सांगण्यात येतं.

महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीची घोषणा झाली आहे. शिवसेना २३ जागांवर तर भाजप २५ जागांवर लढणार असल्याचं निश्चित झालं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. दुसरीकडे युतीनं प्रचाराची रणनिती निश्चित करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या प्रचाराचा कार्यक्रमही या भेटीत ठरल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येतं. कोण किती जागा लढवणार हे ठरलं असलं तरी कोणता उमेदवार कुठे द्यायचा यावरही यावेळी चर्चा झाल्याचं समजतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मोठी सभा होणार असून, महालक्ष्मीचं दर्शन घेऊन युतीच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीला सुभाष देसाई, आदित्य ठाकरे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील आदी नेते उपस्थित होते. यावेळी नवी मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबादसह अन्य महत्वाच्या ठिकाणी होणाऱ्या प्रचार मेळाव्यांवरही एकमत झाल्याचं सांगण्यात येत आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply