News

लोकसभा निवडणूक ठरल्यावेळीच.

18Views

नवी दिल्ली :-

भारत-पाकिस्तान युद्धाचे सावटाखाली असलेली आगामी लोकसभा निवडणूक नियोजित वेळेवरच होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी शुक्रवारी ही माहिती देताना सर्व अटकळींना विराम दिला. साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या १६व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा ५ मार्चनंतर कधीही होण्याची शक्यता आहे.

पुलवामाच्या घटनेनंतर भारत-पाकिस्तानदरम्यानचा तणाव शिगेला पोहोचल्यामुळे लोकसभा निवडणूक पुढे ढकलली जाईल, अशी चर्चा होती. पण सुनील अरोरा यांनी उत्तर प्रदेशातील निवडणूक सज्जतेचा आढावा घेतल्यानंतर या चर्चेला विराम दिला आहे. लोकसभा निवडणूक ठरल्यानुसारच होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीची घोषणा ५ ते १० मार्चदरम्यान कधीही होऊ शकते, असे म्हटले जात आहे. पण सूत्रांच्या मते ८ मार्चला घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्व एक लाख ६३ हजार ३३१ मतदानकेंद्रांवर व्हीव्हीपॅट वापरण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-रालोआशी लढण्यासाठी सज्ज झालेल्या २१ विरोधी पक्षांनी ईव्हीएम मतमोजणीसोबत ५० टक्के व्हीव्हीपॅट मोजण्याची मागणी करणारे निवडणूक आयोगाला लेखी निवेदन दिले आहे. पण निवडणूक आयोगाने आतापर्यंत या मागणीवर कोणतीही भूमिका घेतलेली नाही. मात्र, अरोरा यांनी ईव्हीएमवर भाष्य केले. निकाल अनुकूल लागले तर ईव्हीएम ठीक आहे आणि विरोधात गेले तर ईव्हीएम खराब, अशी प्रतिक्रिया उमटते. आम्ही कळत नकळत संपूर्ण देशात ईव्हीएमला फुटबॉल बनवले आहे, असे मत अरोरा यांनी व्यक्त केले.

लोकसभा व विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने फॉर्म २६च्या प्रतिज्ञापत्राच्या स्वरूपात बदल केले असून आता उमेदवारांना पती, पत्नी, मुले आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या पाच वर्षांच्या उत्पन्नाचा तपशील द्यावा लागेल. त्यात परदेशातील संपत्तीच्या तपशीलाचाही समावेश आहे. ही माहिती पॅन कार्डाच्या क्रमांकासोबत सादर करावी लागेल. या माहितीची प्राप्तिकर खाते शहानिशा करेल. त्यात त्रुटी किंवा विसंगती आढळून आल्यास ही माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येईल आणि संबंधित उमेदवारांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल. निवडणुकीशी संबंधित कोणतीही तक्रार करता यावी म्हणून या निवडणुकीत सी-व्हिजील अॅप लाँच करण्यात येणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply