News

वन-डेमधील षटकार किंग कोण?; धोनी-रोहितमध्ये चुरस.

10Views

नवी दिल्ली:

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये आज हैदराबाद इथं होणारा एकदिवसीय सामना अनेक विक्रमांची रास रचणारा ठरणार आहे. त्यातही वन-डेतील सर्वाधिक षटकारांचा विक्रम भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी खास ठरणार आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी व सलामीवीर रोहित शर्मा या दोघांमध्ये या विक्रमासाठी चुरस असून त्यात कोण बाजी मारणार याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.

धोनी व रोहित या दोघांनीही आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत प्रत्येकी २१५ षटकार ठोकले आहेत. रोहित शर्मा यानं २०१ सामन्यांत ही कामगिरी केली आहे. तर, धोनीनं ३३८ सामन्यांमध्ये २२२ षटकार ठोकले आहेत. मात्र, यातील सात षटकार आशिया इलेव्हन संघासाठी खेळताना मारले आहेत. भारतासाठी खेळताना त्यानं २१५ षटकार ठोकले आहेत. रोहित शर्मानं त्याच्या या विक्रमाची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध या मालिकेत एकूण पाच सामने होणार आहेत. या पाचही सामन्यात रोहित आणि धोनीमधील ‘षटकारयुद्ध’ बघण्याची संधी मिळणार आहे. त्यात ‘किंग’ कोण ठरतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धोनी व रोहितनंतर षटकारांच्या यादीत सचिन तेंडुलकर (१९५), सौरभ गांगुली (१८९) व युवराज सिंग (१५३) याचा क्रमांक आहे.

विश्वविक्रम अफ्रिदीच्या नावावर

एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक षटकारांचा जागतिक विक्रम पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहिद अफ्रिदीच्या नावावर आहे. अफ्रिदीनं ३९८ सामने खेळताना २६९ डावांमध्ये एकूण ३५१ षटकार ठोकले आहेत. जगातील कोणताही फलंदाज अद्याप या विक्रमाच्या जवळपासही पोहोचू शकलेला नाही. अफ्रिदीनंतर ख्रिस गेल दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानं २८८ सामन्यांत ३०५ षटकार ठोकले आहेत. तर, २७० षटकारांसह श्रीलंकेचा सनथ जयसूर्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply