News

वर्चस्वासाठी सज्ज

36Views

 हैदराबाद :-

गाफील न राहता, कामगिरीत सातत्य राखायचे, असा निर्धार केला आहे तो विराट कोहलीच्या भारतीय संघाने. आज, शुक्रवारी विराट आणि कंपनी कसोटी मालिकेतील दुसऱ्या लढतीत पाहुण्या वेस्ट इंडिजचा सामना करणार आहे. पहिला सामना अगदीच एकतर्फी झाला, अशी अवस्था दुसऱ्या सामन्यात होऊ नये, यासाठी विंडीजचा प्रयत्न असेल.

यजमान भारताने पहिली कसोटी एक डाव आणि २७२ धावांनी जिंकली होती. तेव्हादेखील विंडीजकडून प्रतिकार झाला नव्हता. हैदराबादलाही राजकोटप्रमाणे धावांची बरसात होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत असून यावेळीही विराटचा संघ वरचष्मा राखेल, असे दिसते आहे. त्यात विंडीजपुढील अडचणींत वाढ झाली आहे; कारण कर्णधार जेसन होल्डर अजूनही शंभर टक्के फिट नाही. त्यात त्यांचा मुख्य गोलंदाज शॅनन गाब्रिएलच्या समावेशाबाबतही प्रश्नचिन्ह आहे. भारतीय संघाने गेल्या कसोटीप्रमाणे या कसोटीतही आदल्यादिवशीच संघाची घोषणा केली असून विजेत्या राजकोट कसोटीतील अंतिम अकरामध्ये विराटने कोणताच बदल केलेला नाही.

भारतीय संघ सामने एकतर्फी जिंकतो आहे, ही चांगली बाब असली तरी आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या दृष्टिने असे निष्प्रभ सामने टीम इंडियाचे नुकसान करू शकतात ही बाबही नाकारून चालणार नाही. २०११मध्ये भारतीय संघ असाच विंडीजला अस्मान दाखवून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाला होता; पण तिथे यजमान कांगारूंनी भारताला धोबीपछाड देत ४-० असा विजय मिळवला. २०१३मध्येही भारताने घरच्या मैदानावरील लढती जिंकून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर मालिका गमावली होती. हे आता सगळ्यांनाच ठाऊक आहे की विंडीज संघ हा आव्हानात्मक राहिलेला नाही. त्यात भारतीय संघ घरच्या मैदानावर खेळत असेल, तर त्यांची ताकद दुप्पट होते. अशावेळी विंडीज संघ अगदीच उघडा पडतो. भारतीय संघाचा मात्र कसच लागत नाही.

-द्यावे स्वतःला आव्हान

प्रतिस्पर्धी संघच दुबळा असेल, तर खेळाडूंनी स्वतःलाच आव्हान द्यावे, जसे विराट कोहलीने विंडीजविरुद्धच्या राजकोट कसोटीत केले होते. २३० चेंडूंचा सामना करताना विराटने १३९ धावा केल्या होत्या. चौकार, षटकार त्याने टाळले आणि एकेरी-दुहेरी धावांवर भर देत संयमी खेळी करण्यावर भर दिला. १८ वर्षांच्या पृथ्वी शॉ यानेही पदार्पणात शतक केले. त्याला विंडीजच्या गोलंदाजांकडून तसा प्रतिकारही झाला नाही. पृथ्वीने चौकार, षटकारांची आतषबाजी केली होती. विराटची खेळी मात्र आव्हानात्मक झाली. ज्याची तजवीज त्याने स्वतःच केली होती.

-चिंता अजिंक्यची

भारतासाठी चिंतेची बाब म्हणजे उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा फॉर्म. २०१३-१४च्या क्रिकेट मोसमात जो अजिंक्य परदेशात सातत्यपूर्ण कामगिरी करणारा फलंदाज ठरलेला. त्याने दरबानला ९६, वेलिंग्टन ११८, लॉर्ड्स आणि मेलबर्नला मिळून अनुक्रमे १०३ आणि १४५ धावा केल्या होत्या. आता मात्र गेल्या १४ महिन्यांत अजिंक्यच्या बॅटमधून शतक झालेले नाही. त्याचे याआधीचे शतक २०१७च्या ऑगस्टमध्ये श्रीलंकेत झाले होते. यामुळे अजिंक्यवर टीकाही होते आहे. आता विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत अजिंक्यकडून दणदणीत कामगिरी झाली नाही, तर त्याचे नुकसान होईल. ऑस्ट्रेलियाला रवाना होण्याआधी एखादी खणखणीत खेळी अजिंक्यचा आत्मविश्वास वाढवणारी ठरेल. तेव्हा अजिंक्यने निर्धाराने मैदानात उतर आत्मविश्वासाने खेळावे.

प्रतिस्पर्धी संघ

भारत (अंतिम बारा)ः विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि शार्दूल ठाकूर.

वेस्ट इंडिजः जेसन होल्डर (कर्णधार), सुनील अम्ब्रिस, देवेंद्र बिशू, क्रेग ब्रेथवेट, रोस्टन चेस, शेन डॉवरिच, शेनन गाब्रिएल, जाहमर हॅमिल्टन, सिमरन हेटमेयर, शाय होप, अलझरी जोसेफ, कीमो पॉल, कायरॉन पॉवेल, केमार रॉच आणि जोमेल वॉरिकन.

दृष्टिक्षेप

१)वेस्ट इंडिज संघ किमान पहिल्या कसोटीत तरी दुबळा वाटल्याने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताची पूर्वतयारी साजेशी होणार नाही हे नक्की.

२)२०११मध्येदेखील भारताने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्याआधी विंडीजवर २-० असा खणखणीत विजय मिळवला होता; पण ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टीम इंडियाने ०-४ असा मार खाल्ला.

३)वेस्ट इंडिज संघात अनुभवाची कमतरता आहेच; पण या संघातील खेळाडूंचे तंत्रदेखील सदोष आहे, ज्यामुळे कसोटीसारख्या सर्वोच्च दर्जाच्या क्रिकेटमध्ये सध्या विंडीज संघ साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरतो आहे.

सामन्याची वेळ

भारत-वेस्ट इंडिज

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, उप्पल

सकाळी ९.३० पासून

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply