News

विजयाची हॅटट्रीक विदर्भाची.

61Views

नागपूर :-

अत्यंत कमी धावसंख्येच्या लढतीत विदर्भ संघाने सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत विजयाची हॅटट्रीक नोंदवली. संघाच्या तिसऱ्या विजयाचे शिल्पकार ठरले अक्षय कर्णेवार व यष्टीरक्षक जितेश शर्मा, या दोघांच्या उत्तम खेळीच्या जोरावर संघाने राजस्थानचा ४४ धावांनी पराभव केला. स्पर्धेत विदर्भाची पुढील लढत २७ फेब्रुवारीला मेघालय विरुद्ध होईल.

सुरत येथील सी.बी.पटेल इंटरनॅशनल स्टेडियमवर विदर्भाने विजयासाठी दिलेल्या ११८ धावांचा पाठलाग करणाऱ्या राजस्थानच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. विदर्भाचा जलद गोलंदाज दर्शन नळकांडेने राजस्थानच्या दोन धावा झाल्या असताना सलामीवीर आदित्य घरवालला एक धावेवर बाद केले. त्यानंतर मनेंदर सिंग व रॉबिन बिश्त यांनी एक उत्तम भागीदारी रचत संघाला ४७ धावांपर्यंत मजल मारून दिली. मात्र, फिरकीपटू अक्षय कर्णेवारच्या फिरकीला खेळण्यास असमर्थ ठरलेल्या मनेंदर २४ धावा काढून तंबूत परतला. धावसंख्येत चार धावांची भर पडत नाही तर एक चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात माहिपाल लोमरोरला दोन धावावंर अक्षय वखरेने धावबाद केले. राजस्थानचा भरवशाचा फलंदाज रॉबिन बिश्तला (२२) रवी जांगीडने पायचित करत राजस्थानचा निम्मा संघ ५८ धावांवर गारद करत सामन्यावर पकड निर्माण केली. विदर्भाचे गोलंदाज नियमित कालांतराने राजस्थानच्या फलंदाजांना तंबूत पाठवण्यात यशस्वी ठरत होते. संघाची धावसंख्या ६३ असताना अथर्व तायडेने त्याच्या फिरकीवर दीपक चाहर आणि रवी जांगीडने तेजिंदर सिंगला बाद केले. सामन्यातील १७व्या षटकात फिरकीपटू अक्षय कर्णेवारने तीन गडी बाद करत संघाचा विजय निश्चित केला. अक्षयने पहिल्या चेंडूत राहुल चाहरला, चौथ्या चेंडूत रवी बिष्णोई व पाचव्या चेंडूत खलील अहमदला बाद केले. या कामगिरीसह विदर्भाने ४४ धावांनी विजय मिळवत स्पर्धेत विजयाची हॅटट्रीक पूर्ण केली. विदर्भाकडून अक्षय कर्णेवारने सात धावांत ४ गडी टिपण्याची कामगिरी केली. रवी जांगीड व अथर्व तायडेने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

त्यापूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या विदर्भाची सुरुवात निशाजनक झाली. सलामीवीर म्हणून बढती मिळालेला आक्रमक फलंदाज अपूर्व वानखेडे एक धाव करून तंबूत परतला. त्यावेळी संघाच्या १२ धावा झाल्या होत्या. त्यानंतर सलामीवीर अथर्व तायडे व जितेश शर्माने भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र, अथर्व (२३) खलील अहमदचा बळी ठरला. एका बाजूने जितेश संघाच्या धावा वाढवत होता, तर दुसरीकडे विदर्भाने कर्णधार फैज फजल व गणेश सतीशला झटपट गमावले. विदर्भाची धावसंख्या ९७ असताना ४९ धावांवर खेळणाऱ्या जितेशला दीपक चहारने बाद केले. जितेशने २९ चेंडूतील ४९ धावांच्या खेळीत सात चौकार व एका षटकाराचा समावेश होता. तर रवी जांगीडने १४ धावांचे योगदान दिले. विदर्भाचे तळाचे फलंदाज फारशी प्रभावी कामगिरी करू शकले नाही. त्यामुळे विदर्भाचा डाव १६.५ षटकांत ११७ धावांत संपुष्टात आला. राजस्थानच्या खलील अहमदने १८ धावांत पाच गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ- १६.५ षटकात ११७ (जितेश शर्मा ४९, अथर्व तायडे २३, रवी जांगीड १४, गोलंदाजी- एस के अहमद ५/१८, नाथू सिंग २/११) मात राजस्थान ४४ धावांनी – १६.५ षटकात ७२ (एमएन सिंग २४, रॉबीन बिश्त पायचित.गो. जांगिड २२, गोलंदाजी- अक्षय कर्णेवार ४/७, रवी जांगीड २/११)

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply