News

विराट:सिडनीत मालिका विजय मिळवणारच

19Views

मेलबर्न :-

मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाचा १३७ धावांनी धुव्वा उडवल्याने भारतीय संघात उत्साह संचारला आहे. या विजयानंतर कर्णधार विराट कोहलीनेही मालिका विजयाचा आपला इरादा स्पष्ट केलाय. ‘आम्ही आता थांबणार नाही. सिडनीतील चौथी आणि अखेरची कसोटीही आम्हीच जिंकणारच, असं विराटनं म्हटलंय.

मेलबर्न कसोटीतील भारतीय संघाच्या उत्तम कामगिरीचं कोहलीने कौतुक केलं. खास करून सामनावीर जसप्रीत बुमराह, चेतेश्वर पुजारा आणि करिअरमधील पहिला कसोटी सामना खेळणाऱ्या मयांक अग्रवाल यांची कोहलीने प्रशंसा केली. ‘मेलबर्नमधील विजयाने आमचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे सिडनीतील चौथ्या कसोटीत आम्ही सकारात्मक विचारांनी मैदानात उतरू. या चौथ्या सामन्यासह मालिकाही आम्हाला जिंकायची आहे’, असं विराटने सांगितलं. ‘या दौऱ्यात विजय मिळवलेल्या दोन कसोटी सामन्यात आम्ही दमदार कामगिरी केली आहे. यामुळे आम्ही बॉर्डर- गावसकर चषक सुरक्षित ठेवू शकलो. मात्र, लक्ष्य अजून पूर्ण झालेलं नाही’, असं विराटने स्पष्ट केलं.

‘कुठल्याही संघासाठी कसोटीत ४०० धावांचं लक्ष्य पूर्ण करणं एक आव्हान असतं. तसंच आस्ट्रेलियाला मेलबर्नच्या कठीण खेळपट्टीवर ४०० धावांचा पाठलाग करणंही आव्हानच होतं, असं विराट म्हणाला. ‘भारतीय संघातील तिन्ही जलदगती गोलंदाजांनी वर्षात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम केला आहे. यामुळे गोलंदाजांमध्ये उत्साह आहे. तसंच पर्थमध्ये बुमराहला यश आले नव्हते. यानंतर आम्ही बुमराहशी बोललो. यामुळे त्याला सर्वाधिक बळी घेता आले’, असं विराटने सांगितलं.

भारत आणि ऑस्ट्रेलियात चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना हा सिडनीत होणार आहे. पुढच्या आठवड्यात गुरुवारी तीन जानेवारीपासून हा सामना खेळवला जाणार आहे.

सिडनीत होणार ‘पिंक कसोटी’

सिडनीतील कसोटी ही ‘पिंक’ कसोटी म्हणून ओळखली जाते. महिलांमधील स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृतीसाठी या सामन्यात स्टंप ‘पिंक’ रंगाचे ठेवले जातात. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ग्लेन मॅकग्राथ याच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते. मॅकग्राथ हा सिडनीतून खेळत असल्यामुळे सिडनीत होणाऱ्या कसोटी सामन्याला ‘पिंक कसोटी’ असे म्हटले जाते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply