News

शंकेचे कारण नाही; खासदार प्रितम मुंडेच लोकसभेच्या उमेदवार : दानवे

12Views

बीड :-

” शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही, आगामी लोकसभेला सध्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडेच बीडमध्ये भाजपच्या उमेदवार असतील,” असे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले. त्यामुळे पक्षात व विरोधकांत अधून – मधून भाजप उमेदवार कोण, याबाबत होत असलेल्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील  पदव्युत्तर पदवीधारक असलेल्या डॉ. प्रितम मुंडे या विवाहानंतर वैद्यकीय व्यवसायात स्थिरावल्या होत्या. मात्र, दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड लोकसभेची पोटनिवडणुक लढवून त्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या.

मात्र, येत्या लोकसभेला त्याच उमेदवार असतील का, याबाबत राजकीय वर्तुळात अधून – मधून चर्चा असे. कधी त्यांचा कमी झालेला जनसंपर्क तर कधी पक्षाने केलेल्या पाहणीत त्यांचे डाऊन झालेले स्कोअर कार्ड यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत पक्षातील काही नेतेही शंका घेत. तर, कधी त्या स्वत:च आगामी निवडणुक लढविण्यास इच्छुक नसल्याचीही चर्चा होई.

 मात्र, सावरगाव घाट (ता. पाटोदा) येथे झालेल्या दसरा मेळाव्यात पंकजा मुंडेंनी या शंकेचे निरसन  करत प्रितम मुंडेंना उमेदवारी मिळणार आणि त्या निवडणुक लढविणारच हे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले होते. मात्र, आता यावर शुक्रवारी खुद्द प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही आता यावर शिक्कामोर्तब केले आहे.

रावसाहेब दानवे व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे तसेच पक्षाचे संघटनमंत्री भाऊसाहेब देशमुख यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षसंघटनेचा आढावा घेतला. त्यानंतर श्री. दानवे, पंकजा मुंडे यांच्यासह नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 यावेळी आगामी निवडणुकीत पक्षाचा उमेदवार कोण हे ठरले का, या प्रश्नावर रावसाहेब दानवे यांनी ‘शंका घेण्याचे कुठलेही कारण नाही, आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून सध्याच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे याच उमेदवार असतील हे स्पष्ट केले. ही घोषणा करताना बाजूला खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्यासह भाजपचे आमदारही उपस्थित होते. त्यामुळे आता भाजपचा उमेदवार निश्चित झाला असून त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून कोण येणार याकडे लक्ष लागले आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply