News

शत्रुघ्न सिन्हा मोदींविरोधात लढणार?

21Views

लखनऊ: –

पक्षशिस्त मोडून स्वपक्षाच्या सरकारवर सातत्यानं टीकेची धार धरणारे भाजपचे नाराज खासदार शत्रुघ्न सिन्हा हे आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याच्या विचारात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत ते वाराणसी मतदारसंघातून मोदींच्या विरोधात लढण्याची शक्यता आहे. समाजवादी पक्षानं त्यांना उमेदवारी देण्याची तयारी केल्याचंही समजतं.

भाजपमधील लालकृष्ण आडवाणी गटातले समजले जाणारे सिन्हा हे मोदींच्या कार्यकाळात पूर्णत: अडगळीत पडले आहेत. सरकारमध्ये वा पक्ष संघटनेत कुठलेही स्थान नसल्यानं सिन्हा सध्याच्या नेतृत्वावर सुरुवातीपासूनच कमालीचे नाराज आहेत. गेल्या तीन वर्षांपासून ते सतत सरकारला अडचणीत आणणारी वक्तव्ये करत आहेत. मात्र, त्यांची दखलही घेतली जात नसल्यानं ते आता पक्षाविरोधात उघड बंड करण्याच्या निर्णयापर्यंत आले आहेत. त्यासाठी त्यांनी भाजप विरोधकांच्या भेटीगाठींचा सपाटा लावला आहे.

नुकतीच त्यांनी भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांच्यासह लखनऊमधील समाजवादी पक्षाच्या कार्यालयाला भेट दिली. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त सपानं हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजपवर कडाडून टीका केली. त्यामुळं त्यांच्या सपा प्रवेशाच्या चर्चेला उधाण आलं आहे. सपाच्या नेत्यांनीही यास सूचक दुजोरा दिला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप सोडल्यास समाजवादी पक्ष त्यांना वाराणसी मतदारसंघातून तिकीट देऊ शकतो, असं काही नेत्यांनी म्हटलं आहे.

शत्रुघ्न सिन्हा हे कायस्थ समाजाचे आहेत. वाराणसीत कायस्थ समाजाची लोकसंख्या मोठी आहे. शिवाय, सिन्हा हे अभिनेते म्हणूनही लोकप्रिय आहेत. त्या लोकप्रियतेचा फायदा निवडणुकीत त्यांना होऊ शकतो, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे. गुजरातमध्ये यूपी, बिहारींवर होणाऱ्या हल्ल्यांचं भांडवलही मोदींच्या विरोधात लढताना सिन्हा यांच्या कामी येऊ शकतं, असंही बोललं जात आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply