News

शरद पवार उद्या कोल्हापुरात.

14Views

कोल्हापूर:-

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी (ता. १२) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दोन दिवस ते जिल्ह्यात असून लोकसभेच्या राजकीय जुळवाजुळवीसाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण ठरणार आहे. जनता दलाचे श्रीपतराव शिंदे यांच्याशी ते चर्चा करणार असल्याने गडहिंग्लज परिसरात त्यांचा लोकसभेला मदत होण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात दोन वेळा पवार कोल्हापुरात होते. दौऱ्यात राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करत त्यांनी आगामी निवडणुकीच्या तयारीची पेरणी केली. खासदार धनंजय महाडिक यांच्या उमेदवारीचे संकेत दिले. आता पुन्हा ते कोल्हापुरात येत आहेत. ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांना माजी कुलगुरू डॉ. रा. कृ. कणबरकर हे पुरस्कार जाहीर झाला आहे. तो पवारांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे. त्यांच्या दौऱ्यातील हा प्रमुख कार्यक्रम असला तरी दोन दिवस अन्य कार्यक्रम होणार असून त्यातून लोकसभेची जोडणी होण्याची शक्यता आहे.

पवार शनिवारी सकाळी विमानाने बेळगावला येतील. सकाळी दहा वाजता कोडोली येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होईल. त्यानंतर ते दुपारी अडीच वाजता विमानाने कोल्हापुरात येतील. चार वाजता शाहू समाधीस्थळाला भेट देतील. पाच वाजता शिवाजी विद्यापीठात प्रा. पाटील यांना पुरस्कार प्रदान कार्यक्रमास ते उपस्थित राहतील. रात्री कोल्हापुरात त्यांचा मुक्काम आहे. यावेळी ते काही नेत्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत लोकसभेची जुळवाजुळव असणार आहे.

दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी ते गडहिंग्लजला जाणार आहेत. तेथे नगरपालिकेच्या एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहतील. विशेष म्हणजे जनता दलाचे शिंदे यांच्या निवासस्थानी भेट देणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या गटाची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे. त्यामुळेच पवारांची ही भेट आहे. त्यानंतर ते संध्यादेवी कुपेकर यांच्या कानडेवाडी येथील निवासस्थानी ते उपस्थित राहतील. तेथून ते कोल्हापुरात परतणार असून विमानाने मुंबईला जाणार आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply