News

शहांनी संभाव्य उमेदवारांच्या चारित्र्य पडताळणीबरोबर त्यांच्यावर झालेल्या आरोपांची माहिती संकलित केली आहे.

10Views

पुणे :-

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संभाव्य उमेदवारांच्या चारित्र्य पडताळणीबरोबर त्यांच्यावर झालेल्या आरोपांची माहिती संकलित केली आहे. त्यामध्ये भाजपच्या आमदार-खासदारांवर काही आरोप, गुन्हे दाखल झाले आहेत का? त्यांच्यावर न्यायालये तथा इतर सामाजिक संस्थांनी काही आक्षेप घेतले आहेत का? या सर्व माहितीची दखल उमेदवारी जाहीर करताना घेणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली. शहा यांनी महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांची माहिती प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडून तातडीने घेतल्याचे समजते.

स्वच्छ चेहरा आणि प्रतिमा याबरोबरच संभाव्य उमेदवारांच्या कार्यकर्तृत्वाची माहिती भाजपच्या राष्ट्रीय कार्यालयाकडून संकलित करण्यात येत आहे. या उमेदवारांची कुंडली जमा करताना त्यांच्यावर असलेले आरोप, गुन्हे यांचीही माहिती घेण्यात येत आहे. शहा यांनी नुकतेच प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्याकडून महाराष्ट्रातील संभाव्य उमेदवारांसह आमदार-खासदारांची माहिती घेतल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून स्वच्छ कारभाराचा सातत्याने दावा करण्यात येत असल्याने पक्षाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांबाबतही तोच निकष लावण्यात येणार असल्याचा सूत्रांचा दावा आहे.

आगामी निवडणुकांत उमेदवारी देताना भावी आमदार-खासदारांचे चारित्र्य, स्वच्छ प्रतिमा, वाद विरहित आणि कृर्तत्ववान व्यक्तीला उमेदवारी देण्याचा पक्षाचा प्रयत्न राहणार आहे. त्यासाठी शहा यांनी देशभरातील संभाव्य उमेदवारांची माहिती पक्ष संघटनेतून संकलित केली आहे. यापूर्वीही दिल्ली कार्यालयाने राज्यातील कार्यकर्त्यांना फोनद्वारे संपर्क साधत त्यांच्याकडून संभाव्य उमेदवारांबाबत संघटनेतील मत विचारात घेतले आहे. पक्ष संघटनेसह वेगवेगळ्या माध्यमातून उमेदवारांबाबत इत्यंभूत माहिती संकलित करण्यावर पक्ष संघटनेने भर दिल्याने आगामी काळात उमेदवारांची ‘कुंडली’च तिकिट देताना मांडली जाणार आहे. त्यामुळे अनेक उमेदवारांना घाम फुटला असल्याची जोरदार चर्चा आहे.

\Bआरोप तर होणारच…\B

राजकारणात काम करताना विरोधकांकडून आरोप तर होणारच, त्यामुळे पक्ष संघटनेकडून या आरोपांची कितपत दखल घेतली जाईल, याबाबत पक्षातूनच सांशकता व्यक्त करण्यात येत आहे. तर, स्वच्छ प्रतिमा हा पक्षाचा प्रमुख निकष असल्याने प्रतिमा साभांळण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींना पेलावी लागणार असल्याचाही मतप्रवाह आहे. निवडणुकीत निवडून आणण्याची जबाबदारी केंद्रीय तथा राज्यातील नेतृत्वाकडून घेण्यात येत असल्याने, आगामी काळात उमेदवारांना समाजात जपूनच वावरावे लागेल, अशी प्रतिक्रिया उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply