News

शिक्षणमंत्र्यांचा सिनेट सदस्यांशी वाद

16Views

अमरावती:-

राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे व सिनेट सदस्यांमध्ये वादावादी झाल्याची घटना शुक्रवारी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या संवाद सभेत घडली.

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात शुक्रवारी अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ व बुलडाणा या पाच जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थाचालकांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभेला कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर, प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, उच्च व तंत्रशिक्षण सहसंचालक अशोक कळंबे, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, तंत्रशिक्षण सहसंचालक डी. व्ही. जाधव, व्यवस्थापन परिषद सदस्य दिनेश सदस्य, संस्थाचालक हर्षवर्धन देशमुख, वसंतराव घुईखेडकर, दीपक धोटे, श्रीकृष्ण अमरावतीकर उपस्थित होते. तावडे हे संस्थाचालकांशी संवाद साधणार होते. सभेदरम्यान प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे शिष्यवृत्तीबाबत बोलत होते. याचदरम्यान तावडे यांचा ठाकरेंशी वाद झाला. तावडे ऐकून घेत नसल्याचा मुद्दा उपस्थित करीत ठाकरे यांनी आक्षेप नोंदविला. आमचे म्हणणे ऐकायचे नसेल तर सभेला आमंत्रित का करण्यात आले, असा सवाल त्यांनी तावडे यांना केला. आपण बाहेर जात असल्याचेही ते म्हणाले. यावर तावडे यांनी ‘जोरात बोलू नका, तुम्ही कोण?’ असे संतप्त स्वरात म्हटले. यामुळे सभागृहातील वातावरण अधिकच तापले. तावडे यांच्या स्वीय सहायकाने तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. ठाकरेंनाही समजावले. पण, ठाकरे त्यांच्यावरच संतापले आणि सभागृहाबाहेर पडले. यानंतर संस्थाचालकांसोबत तावडे यांनी संवाद साधला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply