News

शिवशाही बसचे भाडे होणार कमी!

25Views

 नागपूर :-

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील शिवशाही बसचे भाडे आता कमी केले जाणार आहे. याबाबतची तयारी सुरू झाली आहे. या बसचे भाडे कमी होणार असल्याने प्रवाशांना स्वस्त दरात आरामदायी प्रवास करायला मिळणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास एस.टी. संचालक मंडळाने हिरवा कंदील दाखविला आहे. भाडेकपात किती होणार, याबाबत निश्चिती नसली तरी ३० टक्के भाडे कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘शिवशाही’च्या सुविधा आणि आकार खासगी बसच्या तोडीस तोड आहे. परिणामी, प्रवाशांची ही बस पहिली पसंती आहे. परंतु, भाडे एसटीच्या पारंपरिक लाल बसच्या तुलनेत २० ते २५ टक्के अधिक असल्यामुळे या बसकडे प्रवाशांनी पाठ फिरविली होती. त्यामुळेच हे भाडे कमी करण्याचा विचार करण्यात आला आहे. तूर्तास एसटी संचालक मंडळाने स्लीपर बसचे भाडे कमी करण्याच्या प्रस्तावास मंजुरी दिली आहे. नागपूर गणेशपेठ बसस्थानकावरून विद्यमान स्थितीत एसी स्लीपर श्रेणीच्या सहा बसेस धावतात. यात नागपूर-हैदराबादचे भाडे १४७० रुपये, नागपूर-पुणे १९७५ रुपये, नागपूर-सोलापूर १६९० रुपये भाडे आहे. रेल्वे भाड्यासोबत तुलना केल्यास हैदराबादसाठी ९००, पुण्यासाठी १२०० व सोलापूरसाठी १३०० रुपये खर्च करावे लागतात. परिणामी, प्रवासी ‘शिवशाही’ऐवजी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply