News

शिवसेनेचा नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध

25Views
नवी दिल्ली :-
बहुचर्चित ‘नागरिकत्व दुरुस्ती विधेयक’ आज संसदेत माडण्यात येणार आहे. मात्र, शिवसेनेनं या विधेयकाला संसदेत कडाडून विरोध करायचं ठरवलं आहे. ‘शिवसेनेनं नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला विरोध करावा असं आवाहन आसाम गण परिषदेनं शिवसेनेला केलं होतं. त्यानंतर या विधेयकाला विरोध करण्याचा आम्ही निर्णय घेतला’ अशी भूमिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केली आहे.

या विधेयकाला विरोध करताना राऊत पुढे म्हणाले की, ‘आसाम गण परिषदेच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाबाबत त्याचं सविस्तर म्हणणं मांडलं. हा विषय हिंदू-मुस्लीम संबंधांपुरता मर्यादित नाही. आसाम राज्याला स्वत:ची संस्कृती आहे, आणि हे विधेयक या संस्कृतीलाच धोका निर्माण करण्याचं काम करणार आहे. हे विधेयक मंजूर झालं तर आसाममध्ये यादवी माजेल.’

शिवसेना ज्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला कडाडून विरोध करण्यासाठी तयारी करत आहे ते विधेयक संसदेत मंजूर व्हावं यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कंबर कसली आहे.
केंद्र सरकारला बांगलादेशातील हिंदूंची काळजी वाटत आहे. बांगलादेशात अत्याचार झालेल्या हिंदूंना भारतात आश्रय देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकता दुरुस्ती विधेयक मंजूर केले जाईल’, अशी स्पष्ट भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे. आसाममधील प्रचारसभेत मोदी यांनी ही भूमिका ठासून मांडली आहे.

जदयू, काँग्रेसचाही विधेयकाला विरोध

आसाम गण परिषदेनं मात्र केंद्र सरकारच्या या भूमिकेचा विरोध केला आहे. शिवसेना आणि आसाम गण परिषदेबरोबरच जदयू, काँग्रेस आणि इतर राजकीय पक्ष देखील या विधेयकाला विरोध करत आहेत.

आगामी लोकसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हा पक्ष अधिक आक्रमक झाला असून तो केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या विविध धोरणांना विरोध दर्शवत आहे. राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर गेल्या ४ वर्षांपासून शिवसेना आणि भाजपचे संबंध बिघडले असून ते अधिकाधिक बिघडत असल्याचं स्पष्ट होत आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला जाहीर विरोध दर्शवत पुन्हा एकदा शिवसेनेनं केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply