News

श्रीसंतवरील आजीवन बंदी उठली; पण मैदान दूरच.

10Views

नवी दिल्ली:

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी आरोप झाल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) आजीवन क्रिकेटबंदी घातलेला भारताचा माजी मध्यमगती गोलंदाज एस. श्रीसंत याला सर्वोच्च न्यायालयानं मोठा दिलासा दिला आहे. श्रीसंतवरील आजीवन बंदी न्यायालयानं उठवली आहे.

२०१३ साली झालेल्या आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग केल्याचा आरोप श्रीसंतवर झाला होता. त्यानंतर बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीनं त्याच्यावर बंदीची कारवाई केली होती. या कारवाईला श्रीसंतनं आधी केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र, केरळ उच्च न्यायालयानं बीसीसीआयचा निर्णय उचलून धरला. त्यानंतर श्रीसंतनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. तिथं त्याला आज दिलासा मिळाला. ‘श्रीसंतवरील बंदीचा कालावधी खूपच जास्त आहे. बीसीसीआयनं त्यावर फेरविचार करावा आणि ३ महिन्यांत निर्णय घ्यावा’, असे आदेश न्यायालयानं दिले. खेळाडूला शिक्षा देण्याचा अधिकार बीसीसीआयला नाही, हा श्रीसंतचा युक्तिवाद मात्र न्यायालयानं फेटाळून लावला. क्रिकेटपटूंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अधिकार बीसीसीआयला आहे, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.

पण मैदान अजून दूर

श्रीसंतवरील आजीवन बंदी उठली असली तरी तो लगेचच क्रिकेटच्या मैदानावर येण्याची शक्यता कमी आहे. कारण, श्रीसंतवरील बंदीचा नवा कालावधी नेमका किती असावा हे ठरविण्याचा अधिकार बीसीसीआयलाच देण्यात आला आहे. त्यावर निर्णयासाठी बीसीसीआयला अजून तीन महिन्यांचा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळं त्याच्यावरील बंदी पूर्ण उठवली जाईल की आणखी काही वर्षे त्याला मैदानाबाहेर ठेवलं जाईल, हे पाहावं लागणार आहे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply