News

सरकारचा हुकूमशाहीचा डाव

15Views

नागपूर:-

केंद्रातील मोदी सरकार देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करून राज्यकर्त्यांचे प्रयत्न हाणून पाडणे आणि राज्यघटना व लोकशाहीच्या रक्षणासाठी काँग्रेस कटिबद्ध असल्याचा दावा माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी केला.

शहर काँग्रेसच्यावतीने पक्षाचा १३४ वा वर्धापन दिवस देवडिया भवनात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाकडे असंतुष्ट गटाचे नेते, पदाधिकारी व त्यांच्या समर्थकांनी नेहमीप्रमाणे पाठ फिरवली. वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला तसेच, तीन राज्यातील विजय आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांचे अभिनंदन करण्यात आले.

काँग्रेसने लोकशाहीचे बिजे रोवून पाळेमुळे अधिक घट्ट केली. केंद्रातील सरकारच्या कारभारामुळे देशातील लोकशाही व धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. जाती-धर्मात तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचे काम चालले आहे. राजकीय स्वार्थासाठी मतांचे ध्रुवीकरण करण्याचा डाव आखला जात आहे. अल्पसंख्यकांना लक्ष्य केले जात आहे. देश संकटात असताना लोकशाही व राज्यघटनेच्या रक्षणाची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची आहे. आपल्या नेत्यांनी देशासाठी बलिदान केले, आपणही प्राणाची बाजी लावून देशाचे रक्षण करावे, असे आवाहनही विलास मुत्तेमवार यांनी केले.

आगामी काळात संघटन बळकट करण्यावर भर देताना शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जनसंघर्ष यात्रा यशस्वी करण्याचे आवाहन केले. ८ जानेवारी रोजी यात्रा प्रारंभ होईल आणि १३ जानेवारी रोजी समारोप होणार आहे. सहाही विधानसभा मतदारसंघाच्या सर्व १८ ब्लॉकमध्ये बैठका घेण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, रमण पैगवार, किशोर गजभिये, शेख हुसेन यांनीही काँग्रेसच्या इतिहासाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे, अतुल लोंढे, नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त अनंतराव घारड, माजी आमदार यशवंत बाजीराव, माजी महापौर नरेश गावंडे, अभिजित वंजारी, संजय महाकाळकर, बंडोपंत टेंभुर्णे, रामगोविंद खोब्रागडे, संदेश सिंगलकर, अॅड. नंदा पराते, रमेश पुणेकर, नितीश ग्वालबंशी, विवेक निकोसे, पंकज लोणारे उपस्थित होते. कार्यक्रमापूर्वी माजी आमदार कृष्णराव पांडव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संचालन डॉ. गजराज हटेवार यांनी केले. कार्यक्रमास योगेश तिवारी, विलास भालेकर, प्रा. अनिल शर्मा, ईर्शाद अली, राजेश पौनिकर, किशोर गीद, दीपक वानखेडे, राजेश कुंभलकर, योगेश विदावत आदी उपस्थित होते.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply