News

सीमाप्रश्नी शरद पवार घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

18Views

कोल्हापूर:-

सीमाप्रश्नी सुप्रिम कोर्टात महाराष्ट्राची भूमिका सक्षमपणे मांडण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, यासाठी उद्या, सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्याची ग्वाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी ठोस कार्यवाही न केल्यास ११ फेब्रुवारीपासून मुंबईत त्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही शिष्टमंडळाने दिला.

कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवेळी चार दिवसांपूर्वी राज्य सरकारची भूमिका मांडणारे महत्त्वाचे वकील हरिष साळवे उपस्थित राहू शकले नाहीत. या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील मध्यवर्ती एकीकरण समितीचे शिष्टमंडळ पवारांना भेटले. या शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, मनोहर किणीकर, प्रकाश मरगाळे यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

सीमाप्रश्नाच्या सुनावणीत कर्नाटक सरकारचे वकील भक्कमपणे बाजू मांडत आहेत, पण महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या दोन वकिलांच्या निधनानंतर नवीन वकीलही नियुक्त केले नाहीत. यामुळे नवीन वकील नियुक्तीसाठी पाठपुरावा आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने पवारांना सांगितले. साळवे यांच्याशी चर्चा करण्याची विनंती त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर तातडीने म्हणजे सोमवारी मुंबईत मुख्यमंत्र्यांना सीमाभागातील शिष्टमंडळासह भेटण्याची ग्वाही पवारांनी दिली.

दरम्यान, कोर्टात लागणारे सर्व कागदपत्रे देऊनही सरकार भूमिका मांडत नसल्याची तक्रार दळवी यांनी केली. येत्या १० फेब्रुवारीपर्यंत जर सरकारने ठोस कार्यवाही केली नाही तर ११ फेब्रुवारीपासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply