News

सुजयकडून मला मोठ्या अपेक्षा:अण्णा हजारे

8Views

 नगर :-

‘विखे पाटील घराण्याला राजकारणासोबतच समाजकारणाचीही मोठी परंपरा आहे. डॉ. सुजय विखे नगर लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यापेक्षा ते विखे घराण्याचे तरुण सदस्य आहेत, याचे मला जास्त आकर्षण आहे. त्यांच्या पणजोबांपासून चालत आलेली परंपरा पुढे नेत ते काहीतरी वेग‌ळे काम करून दाखवतील, अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केली.

नगर लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले डॉ. विखे यांनी शनिवारी (१६ मार्च) हजारे यांची भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना हजारे यांनी ही प्रतिक्रिया दिली. हजारे म्हणाले, ‘जे उमेदवार आहेत, ते मतदारांना भेटण्यासाठी येतातच. त्याच नात्याने डॉ. विखे आले होते. बाकी राजकीय काही बोलणे झाले नाही; मात्र, सुजय यांच्याबद्दल युवा म्हणून आपल्याला आकर्षण वाटते. युवाशक्ती पुढे आली तर देशासाठी काही वेगळे करू शकते. विखे पाटील घराण्याला समाजकारणाचा मोठा वारसा आहे. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळ सुरू करताना जिल्हाच नव्हे तर राज्यात सामाजिक कार्याचा आदर्श घालून दिला. तेच काम बाळासाहेबांनी पुढे नेले. राजकारण्यांबद्दल मतभेद असू शकतात. मात्र, राजकारण आणि समाजकारण फारसे वेगळे नाही. त्याची योग्य अंमलबजावणी करून समतोल साधून समाज आणि देशहिताचे काम करता आले पाहिजे. सुजय तरुण मुलगा आहे. त्याला पणजोबांबासूनची परंपरा आहे. घरातूनच त्याला या गोष्टी शिकायला मिळाल्यात. राजकारण म्हणजे नुसती पदे भूषविणे हा उद्देश नसावा. या पाश्वभूमीवर सुजय घराण्याची परंपरा चालवत काही वेग‌ळे करून दाखवील, अशी मला अपेक्षा आहे.’

या भेटीसंबंधी डॉ. विखे म्हणाले, ‘हजारे व विखे पाटील घराण्याचे जुने संबंध आहेत. त्यांच्या उपोषणाच्या वेळी माझ्या आई-वडिलांनी त्यांची भेट घेतली. काही कारणामुळे मी येऊ शकलो नव्हतो. आता राजकारणात नवी सुरुवात आहे. अण्णा हे आम्हा युवकांचे आर्दश आहेत. त्यामुळे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो. राजकीय काहीही हेतू नव्हता व चर्चाही नाही.’

पवारांच्या वक्तव्यावर नो कॉमेंट्स

राष्ट्रवादी काँग्रेलचे नेते अजित पवार यांनी विखेंचा कथित आरोप फेटाळताना म्हटले होते की ‘आम्ही सुजयला राष्ट्रवादी कांग्रेसकडून उमेदवारी देऊ केली होती, पण त्यांनी ती नाकराली होती. खोटे वाटत असेल तर सुजय यांना समोर आणा.’ या संबंधी डॉ. विखे यांना पत्रकारांनी विचारले असता, ‘या विषयावर आपल्याला आता काहीही बोलायचे नाही,’ असे म्हणत डॉ. विखे यांनी हा विषय टाळला.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply