News

स्मृती इराणी:अभिनंदन मायदेशी परतण्यामागे नरेंद्र मोदींचा पराक्रम.

8Views

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेचे सर्व श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलं आहे. नरेंद्र मोदींच्या पराक्रमामुळेच दोन दिवसांत अभिनंदन वर्धमान यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका झाल्याचं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानने शुक्रवारी रात्री अभिनंदन वर्धमान यांची सुटका केली. पंजाबातील वाघा सीमेवर त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. रात्री ९ वाजून २० मिनिटांनी अभिनंदन यांनी मायभुमीत प्रवेश केला.

‘आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खूप अभिमान असेल की आपल्या स्वयंसेवकाच्या पराक्रमामुळे भारताचा सुपुत्र फक्त ४८ तासांत मायदेशी परतत आहे’, असं स्मृती इराणी यांनी म्हटलं. त्यांचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे होता. नरेंद्र मोदी भाजपात येण्यापूर्वी आरएसएस प्रचारक होते. भाजपा नेते सुधांशू मित्तल यांच्या आरएसएसरवर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनावेळी त्या बोलत होत्या.

भारतीय हवाई हद्दीत घुसलेल्या एका पाकिस्तानी विमानाचा वेध घेत असताना अभिनंदन यांचे मिग विमान अपघातग्रस्त होऊन २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. त्यावेळी पॅराशूटद्वारे उतरत असलेल्या अभिनंदनला पाकिस्तानने अटक केली होती. त्यानंतर त्यांच्या दोन चित्रफितीही पाकिस्तानने जारी केल्या होत्या. त्यात त्यांना मारहाण झाल्याच्या खुणाही जाणवत होत्या. भारताने या चित्रफितींना जोरदार आक्षेप घेत, जीनिव्हा करारानुसार अभिनंदन यांना भारताच्या हवाली करावे, अशी मागणी केली होती. अमेरिका, सौदी अरेबिया आणि चीननेही पाकिस्तानवर दबाव आणल्यानंतर पाकिस्तानने त्यांच्या सुटकेची घोषणा केली होती.

अर्थात हे शांततेच्या दिशेने पाकिस्तानने टाकलेले पहिले पाऊल आहे, अशी बतावणी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती. तसेच भारताकडे चर्चेचा प्रस्ताव ठेवला होता. आधी अतिरेकी गटांवर ठोस कारवाई करा, मगच चर्चेचा विचार करू, असे भारताने त्यांना ठणकावले होते. त्यानंतर गेले दोन दिवस अभिनंदन यांच्या सुटकेकडे देशाचे लक्ष लागले होते.

शुक्रवारी दुपारी बारा वाजता अटारी सीमेवरून ते मातृभूमीवर पाऊल ठेवतील, असे आधी जाहीर झाले होते, त्यामुळे सकाळपासूनच या सीमेवर प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी, वृत्तवाहिन्यांचे वार्ताहर, सेनादलांचे तसेच प्रशासकीय विभागांचे अधिकारी आणि हजारो नागरिक जमले होते. अभिनंदन मातृभूमीवर पाऊल टाकत असल्याचा क्षण साठवण्यासाठी जो तो धडपडत होता. मात्र संध्याकाळही उलटून रात्र झाली, तरी अभिनंदन भारतात न आल्याने लोकांमधील तणाव आणि उत्सुकता शिगेला पोहोचली होती. पाकिस्तान करीत असलेल्या दिरंगााईबद्दलही संतप्त भावना व्यक्त होत होती. अखेर रात्री नऊनंतर अभिनंदन यांना घेऊन पाकिस्तानचे अधिकारी आणि सैनिक येत असल्याचे दूरचित्रवाहिन्यांवरून दिसताच देशभर आनंदाचे वातावरण पसरले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply