NewsSports

स्मृती मंधाना ठरली सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू

65Views

 दुबई :-

भारताची गुणी उपकर्णधार स्मृती मंधाना हिच्यासाठी वर्षाचा अखेरचा दिवस खूषखबर घेऊन आला. ही खबर तिला नव्या वर्षातच नव्हे, तर संपूर्ण कारकिर्दीत आत्मविश्वास देत राहील. भारताच्या या गुणी क्रिकेटपटूला आयसीसीचे मानाचे ‘सर्वोत्तम क्रिकेटपटू’ आणि ‘वनडेतील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू’ असे दोन पुरस्कार लाभले आहेत. १२ वनडेंमध्ये ६६९ धावा, तर २५ आंतरराष्ट्रीय टी-२०मध्ये ६२२ धावांची बरसात, अशी खणखणीत कामगिरी करणारी डावखुरी सलामीवीर स्मृतीला ‘वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू’चा मान म्हणून रिचेल हेहोइ फ्लिंट पुरस्काराने गौरवले जाणार आहे.

वनडेतील धावा स्मृतीने ६६.९०च्या सरासरीने तडकावल्या आहेत, तर टी-२०मध्ये धावा करताना स्मृतीने १३०.६७च्या स्ट्राइकरेटने धावांची वसुली केली आहे. हे वृत्त सहाजिकच स्मृतीसाठी खास ठरले. ती म्हणते, ‘कामगिरीसाठी जेव्हा अशा पुरस्काराने गौरवले जाते तेव्हा पुढील वाटचालीसाठी दुप्पट स्फूर्ती मिळते. अधिक मेहनत करण्याची ताकद आपोआप येते आणि परिणामी आपल्या संघासाठी सर्वोत्तम कामगिरी होते…’ स्मृतीला काय बोलावे अन् काय नको असे होते. ‘किमबेरले येथे मी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेले शतक मला समाधान देणारे ठरले. त्यानंतर घरच्या मैदानांवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकादेखील फळल्या. मी घरच्या मैदानांवर चांगली खेळत नाही, अशी टीका माझ्यावर व्हायची. हा शिक्का पुसायचा होता, टीकाकारांना कामगिरीतून उत्तर द्यायचे होते अन् त्यापेक्षा मला काहीतरी सिद्ध करायचे होते. त्या इर्ष्येपोटी धावा होत गेल्या…’, स्मृती नमूद करते.

ऑस्ट्रेलियाची सलामीवीर, यष्टीरक्षक अलायसा हीलीने महिला टी-२० वर्ल्डकपमधील सहा लढतींमध्ये २२५ धावा ठोकल्या. ती आयसीसीच्या ‘सर्वोत्तम महिला टी-२० खेळाडू’ या पुरस्काराची मानकरी ठरली. इंग्लंडची १९ वर्षांची सोफी एक्लेस्टन सर्वोत्तम उदयोन्मुख क्रिकेटपटू ठरली आहे. मोसमातील नऊ वनडेंमध्ये १८, तर १४ टी-२०मध्ये १७ मोहरे टिपून सोफीने हा पुरस्कार जिंकला आहे.

आयसीसीकडून खास अभिनंदन

आयसीसीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन यांनी आयसीसीतर्फे स्मृतीला शुभेच्छा दिल्या. ‘आपल्या सुरेख खेळींनी स्मृतीने क्रिकेट पाठिराख्यांचे मनोरंजन केले. तिच्या खेळींनी महिला क्रिकेटसाठी हे वर्ष संस्मरणीय ठरले’, असे कौतुकोदगार रिचर्डसन यांनी काढले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply