News

हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मतदारांना, विशेषतः तरुणाईला ब्लॉगद्वारे आवाहन केलं आहे.

8Views

नवी दिल्ली:-

लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित झाल्या आहेत. मतदानासाठी आता महिनाभरापेक्षा कमी काळ उरला आहे. हा लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील मतदारांना, विशेषतः तरुणाईला ब्लॉगद्वारे आवाहन केलं आहे. मतदान ओळखपत्र मिळवणे आणि मतदान करणे ही अभिमानाची बाब आहे, असंही मोदींनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आता महिनाभरापेक्षा कमी काळ उरला आहे. मतदान हे आपल्या महत्वाच्या कर्तव्यांपैकी एक आहे. देशाच्या विकासाच्या वाटचालीत आपलं मत हे महत्वाचं असतं. मतदानाचा हक्क बजावून आपण देशाचे स्वप्न आणि अपेक्षा पूर्ण करण्यात योगदान देत असतो, असं मोदींनी ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

मतदान ओळखपत्र प्राप्त करणं आणि मतदानाचा हक्क बजावणं ही अभिमानास्पद बाब आहे. आपल्या सर्वांचा उत्साह द्विगुणीत व्हावा. विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी हा लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असं आवाहनही त्यांनी केलं. मतदान न करणाऱ्यांना पश्चाताप होईल असं वातावरण तयार करा, असं म्हणत मोदींनी देशवासियांना चार आवाहने केली.

आजच नोंदणी करा!

मतदान ओळखपत्र असणं ही प्रत्येकासाठी अभिमानाची बाब व्हावी. जर तुम्ही मतदार म्हणून नोंदणी केली नसेल तर लवकरात लवकर ती करावी. तुम्ही www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्जही करू शकता. याशिवाय बूथ पातळीवरील अधिकारी किंवा मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी करू शकता. २०१९ मधील निवडणूक खूपच महत्वाची आहे. ज्या युवकांनी आतापर्यंत मतदार नोंदणी केली नाही, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी आणि आपली महान लोकशाही आणखी मजबूत करावी, असं आवाहन मोदींनी केलं.

मतदार यादीत नाव असल्याची खात्री करा!

वेळ काढून मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही ते पाहा. राज्याच्या निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन मतदार यादीत तुमचं नाव आहे का हे पाहू शकता. जर तुमचं नाव मतदार यादीत नसेल तर संबंधित कर्मचाऱ्यांना याबाबत कळवा. जर तुम्ही घर बदललं असेल तर तेथील मतदार यादीत तुमचं नाव आहे का? याची खात्री करून घ्या. आपल्या क्षेत्रात ज्या टप्प्यात मतदान होणार आहे, त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत मतदार यादीत सुधारणा करण्याचं काम सुरू असतं. पण अखेरच्या तारखेपर्यंत वाट पाहू नका. आजच मतदार नोंदणी करा.

आपली कामे विचारपूर्वक ठरवा

निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्या आहेत. मतदानाच्या दिवशी उपलब्ध असाल, असं नियोजन करा. उन्हाळ्यात सुट्टीवर जाणार असाल तर मतदानाच्या आधी किंवा मतदानानंतर जावे. तुमचं एक मत देशाचं भविष्य निश्चित करेल. गरज वाटल्यास मतदान करण्यासाठी सुट्टी घ्या.

इतरांनाही प्रोत्साहन द्या!

तुमच्या कुटुंबातील सदस्य आणि मित्रमंडळीलाही मतदानासाठी प्रोत्साहन द्या. शक्य असेल तर मतदानाच्या दिवशी मत देण्यासाठी त्यांनाही केंद्रावर सोबत घेऊन जा. २०१९मध्ये होणाऱ्या या लोकसभा निवडणुकीत विक्रमी संख्येनं मतदान करा. मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी विविध क्षेत्रांतील प्रभावशाली व्यक्ती आणि राजकीय, उद्योग, क्रीडा, चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी पुढे यावं, असं आवाहनही मोदींनी केलं.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply