News

हिंदू महासभेवर बंदी घालण्याची मागणी

13Views

 पुणे :-

महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीदिनी उत्तर प्रदेशमधील अलीगड येथे हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी गांधी यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून शौर्य दिवस साजरा केला. या कृत्याच्या निषेधार्थ पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने सोमवार पेठेतील नरपतगिरी चौकात आंदोलन केले. या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून महात्मा गांधी यांचा अपमान करणाऱ्या हिंदू महासभेवर बंदी घालण्याची मागणी केली.

काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या आंदोलनात अॅड. अभय छाजेड, काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे, संगीता तिवारी, सदानंद शेट्टी, लता राजगुरू, अविनाश बागवे, अजित दरेकर, चाँदबी नदाफ, सुजाता शेट्टी, वैशाली मराठे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. ‘अलीगड येथे हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेवर गोळ्या झाडून नथुराम गोडसेचा जयजयकार केला. त्यामुळे हिंदू महासभेचा खरा चेहरा समोर आला आहे. महात्मा गांधी यांनी देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मृतिदिनी जातीयवादी शक्तींनी केलेले हे कृत्य निषेधार्ह आहे. उत्तर प्रदेश सरकारने हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच हिंदू महासभेच्या संघटनेवर बंदी आणावी’, अशी मागणी बागवे यांनी केली. ‘उत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कृत्याचा निषेधही व्यक्त केला नाही. भाजपच्या राजवटीत जातीयवादी आणि धर्मांध शक्ती डोके वर काढत आहेत. त्यामुळे अल्पसंख्याक, मागासवर्गीयांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply