News

हेल्मेट सक्तीविरोधात पुणेकरांची दुचाकी रॅली

15Views

 पुणे:-

हेल्मेट सक्तीविरोधी कृती समितीने ‘सविनय कायदेभंगा’ची भूमिका घेत येत्या गुरुवारी (दि. ३) पोलिस आयुक्तालयावर हेल्मेट न घालता दुचाकी रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. नवी पेठेतील पुणे श्रमिक पत्रकार संघाजवळून ही रॅली काढण्यात येणार असून त्याद्वारे पोलिस आयुक्तांना निवेदनही देण्यात येणार आहे. दरम्यान, या कृती समितीने नागरिकांना आवाहन करत शहरातील सर्व आमदार, खासदारांना त्यांच्या मोबाइलवर हेल्मेट सक्ती रोखण्यासाठी विनंती करण्याचे ‘मेसेज’स पाठविण्यास सांगितले आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हेल्मेट सक्तीविरोधात शहरात वातावरण पेटायला सुरुवात होईल, असे चित्र निर्माण झाले आहे.

पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी नवीन वर्षांत हेल्मेटसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधातील कारवाईची दिवसेंदिवस धार वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने मंगळवारी घेतलेल्या बैठकीत सविनय कायदेभंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला माजी महापौर अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, मोहनसिंग राजपाल, विवेक वेलणकर, श्याम देशपांडे, संदीप खर्डेकर, धनंजय जाधव, सूर्यकांत पाठक, डॉ. शैलेश गुजर, बाळासाहेब रुणवाल, मंदार जोशी आदी उपस्थित होते.

वाहतूक पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्या दुचाकीस्वारांविरोधात कारवाई सुरू केल्याने नागरिकांमधून प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. ‘पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा ‘इगो’ निर्माण केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या सक्तीमुळे निर्माण झालेल्या लोकक्षोभाची कल्पना दिली आहे. पोलिस आयुक्त हे नागरिक आणि पोलिसांमध्ये दरी निर्माण करत असून त्यांनी आपली हटवादी भूमिका सोडावी,’ अशी मागणी संदीप खर्डेकर यांनी केली आहे. हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने घेतलेल्या बैठकीत या कारवाईविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या असून येत्या गुरुवारी पोलिस आयुक्तालयावर दुचाकी रॅली काढण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. या रॅलीमध्ये दुचाकीस्वार हेल्मेट न घालता सविनय कायदेभंगही करणार असल्याची माहिती या वेळी देण्यात आली.

सोशल मीडियावर सक्तीविरोधात एल्गार 

शहरातील आमदार, खासदार, महापौर तसेच महापालिकेतील लोकप्रतिनिधींचे मोबाइल क्रमांक समितीने सोशल मीडियावर व्हायरल केले असून त्यांना हेल्मेट सक्ती रोखण्यासाठी विनंती करण्यात यावी, असे आवाहन या समितीने केले आहे. नागरिकांनी या लोकप्रतिनिधींच्या मोबाइलवर मेसेजचा पाऊस पाडून त्यांना या सक्तीबाबत प्रतिक्रिया नोंदविण्यास भाग पाडावे, अशी भूमिका समितीने घेतली आहे. शहरातील लोकप्रतिनिधी या सक्तीबाबत भाष्य करण्यास तयार नसल्याने हे पाऊल उचलल्याची माहिती समितीच्या सदस्यांनी दिली.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply