News

हॉकी प्रशिक्षक हरेंद्रसिंग यांची हकालपट्टी

19Views

नवी दिल्ली :-

भुवनेश्वर येथे झालेल्या हॉकी वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे मार्गदर्शक असलेले हरेंद्रसिंग यांची प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. हॉकी इंडियाने सीनियर संघाचे प्रशिक्षक म्हणून त्यांना हटवले असले तरी त्यांच्यावर ज्युनियर संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गेल्या वर्षभरात झालेल्या कामगिरीच्या आधारावर हरेंद्रसिंग यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

खरे तर भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकांची हकालपट्टी आणि सातत्याने या पदांवर नियुक्त केल्या जाणाऱ्या व्यक्ती हे आता नित्याचेच बनले आहे.

हॉकी इंडियाने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, २०१८ हे वर्ष भारतीय हॉकी संघासाठी निराशाजनक होते आणि ज्या अपेक्षा हॉकी संघाकडून केल्या गेल्या होत्या, त्यांची पूर्ती या वर्षात झाली नाही. तरीही हॉकी इंडियाने ज्युनियर हॉकीत अधिक लक्ष घालणे आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन पुढील पावले टाकण्याचे ठरविले आहे.

गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघाला हात हलवत परत यावे लागल्यानंतर ज्युनियर संघाचे प्रशिक्षक असलेले हरेंद्र सिंग यांच्याकडे सीनियर संघाची जबाबदारी सोपविण्यात आली. पण ते संघाच्या कामगिरीत फरक पाडू शकले नाहीत. किंबहुना, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आशियाई क्रीडा स्पर्धेत गतविजेत्या भारताला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. वर्ल्डकपमध्ये तर भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीतच गारद झाला.

हॉकी इंडियाने नव्या प्रशिक्षकासंदर्भात म्हटले आहे की, नव्या प्रशिक्षकासाठी हॉकी इंडिया लवकरच अर्ज मागवणार आहे. फेब्रुवारीत भारतीय सीनियर संघ सुलतान अझलन शहा हॉकीसाठी शिबिरात एकत्र येईल. २३ मार्चपासून ही स्पर्धा रंगणार आहे.

हरेंद्रसिंग यांच्या हकालपट्टीनंतर भारतीय संघाची जबाबदारी उच्च कामगिरी संचालक डेव्हिड जॉन व विश्लेषण प्रशिक्षक ख्रिस सिरिएलो यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

हॉकी इंडियाच्या उच्च कामगिरी व हॉकी विकास समितीचे प्रमुख आर. पी. सिंग, हरबिंदर सिंग, बी.पी. गोविंदा, सय्यद अली यांनी हरेंद्र यांची नियुक्ती ज्युनियर संघाचे प्रशिक्षक म्हणून पुन्हा केली आहे. २०२१मध्ये ज्युनियर वर्ल्डकप स्पर्धा होत आहे आणि २०२० व २०२४मध्ये ऑलिम्पिकचे आव्हानही भारतीय संघासमोर असेल.

हरेंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर संघाने २०१६मध्ये वर्ल्डकप जिंकला होता.

भारतीय पुरुष हॉकी संघाचे प्रशिक्षक सातत्याने बदलण्याची परंपरा मोठी आहे. त्याबद्दल भारताचे माजी कर्णधार झफर इक्बाल यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, हा हॉकी इंडियाचा पूर्णपणे अव्यावसायिक दृष्टीकोन आहे. ऑलिम्पिकसाठी दोनवर्षांपेक्षाही कमी कालावधी राहिलेला असताना असा बदल करणे योग्य नव्हते. मात्र ही परंपराच आहे त्यामुळे त्याचे आश्चर्य वाटले नाही. अशा पद्धतीने प्रशिक्षक बदल होत राहिले तर भारतीय संघाकडून जिंकण्याची अपेक्षा करता येणार नाही. जर्मनीचा संघही उपांत्य फेरीत पराभूत झाला म्हणून त्यांचा संघ वाईट होता असे नाही.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply