News

२०१९ मध्ये रायबरेलीत सोनिया गांधी नव्हे तर प्रियंका काँग्रेसच्या उमेदवार ?

21Views

मागील वर्षी मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडसारख्या मोठ्या राज्यांमध्ये सत्ता मिळवलेल्या काँग्रेसमध्ये मोठा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. याचवर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेसने आपल्या निवडणुकीच्या रणनीतीवर काम करण्यास सुरूवात केली आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, सोनिया गांधी यांचा लोकसभा मतदारसंघ रायबरेलीतून प्रियंका गांधी वढेरा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. प्रकृतीच्या कारणास्तव सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे मतदारसंघात बोलले जात आहे. त्यामुळे तेथील तयारी आणि संघटनेतील फेरबदलासाठी प्रियंका यांचा सल्ला घेतला जात आहे.

‘एनबीटी’ या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार काही दिवसांपूर्वी प्रियंका यांच्या मंजुरीनंतरच ८ ब्लॉक अध्यक्ष बदलण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून ठराविक कालावधीनंतर प्रियंका सातत्याने राजकारणात सक्रीय होण्याची चर्चा रंगत असते. त्यामुळे काँग्रेस अडचणीच्या काळात प्रियंका यांना केवळ निवडणुकीत उभा करणे नव्हे तर उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीयही करू शकते. त्याचबरोबर मागील निवडणुकीनंतर सोनिया गांधी या मतदारसंघात जास्त फिरकल्या नाहीत.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवेळी प्रियंका पडद्यामागे खूप सक्रीय होत्या. निवडणुकीनंतर पुन्हा त्या राजकारणापासून दूर झाल्या होत्या. आता तीन राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर प्रियंका पुन्हा एकदा कार्यरत झाल्या आहेत.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply