News

४० जागा जिंकू

26Views

लातूर :-

इतर पक्षांना नेत्यामुळे विजय मिळतो, मात्र भाजपला बूथ कार्यकर्त्यांमुळे विजय मिळत असतो, असे सांगतानाच २०१९ची लोकसभा निवडणूक पानीपतच्या युद्धासारखी महत्त्वाची असून, ती युगप्रवर्तक आहे, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी केले. तर, ‘राज्यात युती होईल की नाही, याचा विचार करत बसण्यापेक्षा आपल्याला लोकसभेच्या ४८पैकी ४० जागा जिंकायच्या आहेत आणि आपण त्या जिंकू शकतो, या विश्वासाने लक्ष केंद्रीत करून प्रत्येक व्यक्ती व घराशी संपर्क करावा,’ असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना दिला.

लातूरमध्ये रविवारी लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली या चार लोकसभा मतदारसंघातील बूथ कार्यकर्त्यांचा मेळावा अमित शहा यांच्या उपस्थितीत झाला. या वेळी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते. बूथ कार्यकर्ता हाच पक्षाचे बळ आहे, असे सांगतानाच अमित शहा म्हणाले, ‘लोकसभेची २०१९ची निवडणुक ही तिसऱ्या पानीपतच्या युद्धासारखी आहे. ही युगप्रवर्तक लढाई आहे. या लढाईनंतर देशातील घुसखोरांना वेचून-वेचून देशाबाहेर पाठवले जाणार आहे. देशातील घुसखोरांविषयी काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा गौरव जगात वाढविल्याचे सांगून मोदी हे देशासाठी गौरव असल्याचा उल्लेख त्यांनी केला. २०१९च्या विजयानंतर ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्येही भगवा फडकेल.’

फडणवीस म्हणाले, ‘महाराष्ट्राला दुष्काळ नवा नाही, परंतु यावर्षी प्रथमच ऑक्टोबरमध्ये दुष्काळाचा सामना करण्यासाठी तयारी केली गेली आहे. केंद्र सरकारकडून मदत मिळणार असून, मी पंतप्रधान मोदी यांचीही भेट घेऊन चर्चा केली आहे. योग्य ती मदत शेतकऱ्यांच्या थेट खात्यावर लवकरच जमा केली जाणार आहे. राज्यात युती होईल किंवा नाही याचा विचार करीत न बसता आपल्याला लोकसभेच्या ४८पैकी ४० जागा जिंकायच्या आहेत आणि आपण त्या जिंकू शकतो असा विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारने केलेल्या कामांच्या लाभार्थीवर लक्ष केंद्रित करून प्रत्येक व्यक्ती आणि घराशी संपर्क करून विजयासाठी प्रयत्न करा.’

या मेळाव्याला संघटनमंत्री विजय पुराणिक, प्रदेश सरचिटणीस आमदार सुजीतसिंह ठाकूर, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड यांचीही उपस्थिती होती.

‘आरक्षण मिळेपर्यंत मंत्रालयात जाणार नाही’
नांदेड : धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषयी मार्गी लागणार नाही, तोपर्यंत मंत्रालयाची पायरी चढणार नाही, यासाठी वेळ प्रसंगी सरकारवर काठी उगारायला मागेपुढे हटणार नाही, असा इशारा ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिला. माळेगाव यात्रेमध्ये आयोजित धनगर जागर मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी त्या बोलत होत्या. सत्तेत ७० वर्षे राहणाऱ्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावता आलेला नाही, मात्र केंद्रात व राज्यात धनगर समाजामुळे सत्तापरिवर्तन झाले आहे. या समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यातील भाजप सरकार अनुकुल भूमिका घेत असून, आम्ही दिलेला शब्द पाळणार आहोत, असेही त्यांनी नमूद केले.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply