News

डेंग्यूने वाढविली धास्ती.

132Views

सातपूर :- 

परिसरात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याने परिसरातील रहिवासी चांगलेच धास्तावले आहेत. परिसरातील काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यांच्या भागातही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण वाढत असून, त्याकडे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. डेंग्यूने त्रस्त असलेल्या नागरिकांची माहिती तरी घ्यावी, अशी मागणी परिसरातून होत आहे.सातपूर भागातील अशोकनगर येथे दर वर्षी डेंग्यूच्या आजाराचे अनेक रुग्ण आढळून येतात. यंदाही येथे डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. मात्र, तरीही महापालिकेकडून केवळ नावालाच प्रबोधनाची मोहीम राबविण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. महापालिकेच्या सातपूर प्रभागात असलेल्या कामगारनगर, अंबड लिंकरोड, सावरकरनगर, अशोकनगर, राधाकृष्णनगर, शिंदे मळा परिसर आदी भागातील असंख्य कामगारांच्या कुटुंबीयांना डेंग्यू अथवा डेंग्यूसदृश आजाराची लागण झाली आहे. परंतु, तरीही जिल्हा रुग्णालय अथवा महापालिकेचा आरोग्य विभाग या प्रकाराकडे दुर्लक्ष करीत असल्याने दिवसेंदिवस या रुग्णांची संख्या वाढतच आहे. सरकारी यंत्रणांकडून उपचारांबाबतही हलगर्जीपणा केला जात असल्याने दुखणे अन् औषधोपचाराच्या खर्चाने कामगार जेरीस आले आहेत. महापालिकेच्या मलेरिया विभागाने सातपूर भागात रस्त्यांवर साचलेल्या पाण्यांमध्ये औषध फवारणी करावी, अशी मागणी कामगारवर्गाकडून होत आहे.                                                                                            जेसीबीतील पाण्यात अळ्या:-                                                                                                                                                                                       अशोकनगर भागात असलेल्या दत्त मंदिर परिसरातील महापालिकेच्या मोकळ्या जागेवर खासगी मालकीचा जेसीबी उभा करण्यात आलेला आहे. या जेसीबीत साचलेल्या पावसाच्या पाण्यात डासांच्या अळ्या असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. या स्वच्छ पाण्यात डेंग्यूच्या डासांची निर्मिती झाल्यास आसपास राहणाऱ्यांचे आरोग्यच धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. मात्र, यासंदर्भात तक्रारी करूनदेखील दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील रहिवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

सातपूर भागात गेल्या काही वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांचे घरात पाणीसाठा करताना काय काळजी घ्यावी, याबाबत प्रबोधन केले जाते. मात्र, असे असतानादेखील साचलेल्या स्वच्छ पाण्यात तयार होणाऱ्या डासांमुळे डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण परिसरात मोठ्या संख्येने आढळून येत आहेत.                                                                                                                                          अचानक थंडीतापाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात रक्त तपासणी केली असता डॉक्टरांनी डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे सांगितले. घराजवळ असलेल्या पावसाळी पाण्याच्या ढाप्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने डेंग्यूचे डास निर्माण होत असावेत. महापालिकेच्या संबंधित विभागाने याप्रश्नी लक्ष घालावे.

Nikita Wagde
the authorNikita Wagde

Leave a Reply